म्हसवड (सातारा) : विशिष्ट जातीच्या महिलांना मंदिरात प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ म्हसवड येथील अंबामाता मंदिरात भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सर्व जाती-धर्माच्या महिलांना सोबत घेऊन थेट गाभा-यात प्रवेश केला. गुरुवारी सकाळी या मंदिरात प्रवेश केलेल्या महिलांच्या गर्दीत बुरखा घातलेली एक कार्यकर्तीही ठळकपणे जाणवत होती.येथील अंबामाता मंदिरात नवरात्रीमध्ये महिला उपनगराध्यक्षा स्नेहलता सूर्यवंशी यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी याच मंदिरात गुरुवारी गाभा-यात जाऊन दर्शन घेण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी मंदिरात जाऊन देवीच्या मूर्तीला ओटीभरण केले. मात्र यावेळी तृप्ती देसाई नव्हत्या. माधुरी टोणपे, रेखा सूर्यवंशी, वंदना मदने, सुमन फाळके आणि शबाना मुल्ला यांच्यासह अनेक महिला या अनोख्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्त्व राजकुमार डोंबे यांनी केले. तसेच काही वेळानंतर श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.यापूर्वीची घटना अशी की, म्हसवडच्या अंबामाता मंदिरात उपनगराध्यक्षा स्नेहलता सूर्यवंशी गेल्या होत्या. त्यावेळी ‘त्यांना तुम्ही कोण आहात याची माहितीही मला करून घ्यायची नाही. तुम्हाला देवीचे दर्शन घ्यायचे असेल तर ते लांबूनच घ्यावे लागेल,’ असे म्हणत पुजारी प्रकाश केसकर याने प्रवेश नाकारला होता. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध केला गेला होता. त्यानंतर संबंधित पुजाºयाने माफीही मागितली होती.
विशिष्ट जातीच्या महिलांना प्रवेश नाकारणा-या मंदिरात सर्व जाती-धर्माच्या महिलांकडून ओटीभरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 2:21 PM