मुंबई : विदेशी पर्यटक व मुंबईकरांसाठी उभारण्यात येणाऱ्या सेल्फी पॉइंटला मुंबई पुरातन वास्तू समितीने रेड सिग्नल दिला आहे. महापालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसचे रूप झाकले जाणार असल्याचा आक्षेप समितीने घेतला आहे. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य आपल्या सेल्फीसह कैद करण्यासाठी सेल्फीप्रेमींना आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.ऐतिहासिक वास्तू असल्याने पर्यटकांसाठी आकर्षण ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक आणि पालिका मुख्यालय या दोन्ही इमारत परिसरात सेल्फी पॉइंट उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र या इमारती पुरातन वास्तू असल्याने याचा प्रस्ताव पुरातन वास्तू समितीच्या टेबलावर मांडण्यात आला होता. परंतु या प्रस्तावित गॅलरीची उंची जास्त असल्याने पालिका मुख्यालयाच्या इमारतीचे सौंदर्य बाधित होत असल्याची नाराजी समितीने व्यक्त केली.त्यामुळे आता हा प्रस्ताव पुन्हा एकदा विभाग कार्यालयाकडे पाठवून आवश्यक बदल करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार पालिका मुख्यालयाचे रूप झाकले जाणार नाही, असा पद्धतीने हा प्रस्ताव तयार करून मगच समितीपुढे सादर करण्यात येणार आहे. या गॅलरीसाठी सुमारे ८० लाख ४५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र हा प्रस्ताव रखडल्यामुळे आता निवडणुकीनंतरच सेल्फीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. (प्रतिनिधी)सेल्फी गॅलरीसाठी हेच बेस्टयुनोस्कोने छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाला राज्यातील ऐतिहासिक रेल्वे स्थानक म्हणून घोषित केले आहे. सीएसटी रेल्वे स्थानकाची इमारत ही ताजमहालनंतर छायाचित्रणासाठी देशातील प्रेक्षणीय इमारत म्हणून ओळखली जाते. तसेच त्यालगत असणारी महापालिकेची मुख्य इमारत हीदेखील देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. या दोन्ही ऐतिहासिक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी पर्यटक येत असतात.अपघात टाळण्यासाठी...इमारतीसह आपला सेल्फी टिपण्यासाठी भर रस्त्यात उभे राहून पर्यटक सेल्फी काढत असल्याने वाहतुकीस अडथळा व पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेने सीएसटी भुयारी भागात पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यालय लखलखणार : छत्रपती शिवाजी टर्मिनस इमारतीच्या धर्तीवर महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला रोशणाई करण्यात येणार आहे. यासाठी सव्वाआठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उंचीमुळे फेटाळला प्रस्ताव : या इमारतीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी लावलेल्या खिडक्या पाच फुटांवर आहेत. तर ही गॅलेरी त्यावर तीन फूट असणार आहे. त्यामुळे या इमारतीचे सौंदर्य बाधित होत आहे. म्हणूनच हा प्रस्ताव समितीने रोखला आहे.
सेल्फी गॅलरीला आक्षेप
By admin | Published: December 25, 2016 3:07 AM