राज्यपाल नियुक्त ‘त्या’ १२ जणांच्या यादीतील काही नावांवर आक्षेप; जाणून घ्या कोणाचा पत्ता कट होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 06:38 PM2021-09-01T18:38:12+5:302021-09-01T18:40:21+5:30
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र काही कारणास्तव ही भेट झाली नाही
मुंबई – विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांची लवकर नियुक्ती करावी अशी मागणी वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. ६ नोव्हेंबर २०२० रोजी महाविकास आघाडी सरकारनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १२ जणांच्या नावाची यादी पाठवली होती. राज्यपाल नियुक्त जागांबाबत नियुक्तीचा वाद कोर्टापर्यंत गेला. मात्र आता ही १२ जणांच्या नावाची यादी काही दिवसांत जाहीर होईल अशी चर्चा सध्या सुरु आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र काही कारणास्तव ही भेट झाली नाही. परंतु आज उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र या १२ नावांमधली काही नावांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या नावांच्या बदल्यात दुसरी नावं देता येतील का? यावर महाविकास आघाडीत चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जणांच्या यादीतील आक्षेप घेतलेली नाव वगळण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. राज्यपालांसोबत होणाऱ्या चर्चेत जर राज्यपालांनी १२ नावांपैकी काही नावांवर आक्षेप आहे असं सांगितले. तर महाविकास आघाडी त्यांनी दिलेल्या यादीवर ठाम राहिल का? कारण राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या नावांची यादी राज्यपालांना पाठवण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीच्या यादीवर ठाम राहिले तर आणखी काही काळ ही नावं घोषित होण्यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र विधान परिषदेत आपापलं संख्याबळ वाढवण्यावर तिन्ही पक्षांनी भर देत काहीतरी तडजोडीची भूमिका घेतली तर लवकरच ही यादी घोषित केली जाईल.
तसेच यासोबत जर राज्यपालांनी महाविकास आघाडीची नावं आहे तशी मंजुरी दिली तर राज्यातील महाविकास आघाडी शासन भक्कम असल्याचं चित्र समोर येईल. परंतु सध्याच्या स्थितीत राज्यपाल आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेटीत नेमकं काय घडतं याकडे सर्वांचे लक्ष आहे. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ जणांपैकी काही नावांवर आक्षेप घेतला आहे.
कोणती १२ नावांची यादी सरकारने दिलीय?
काँग्रेस – सचिन सावंत(सहकार आणि समाजसेवा), मुझफ्फर हुसैन(समाजसेवा), रजनी पाटील, अनिरुद्ध वणकर
राष्ट्रवादी काँग्रेस – एकनाथ खडसे(सहकार आणि समाजसेवा), राजू शेट्टी(सहकार आणि समाजसेवा), प्रा. यशपाल भिंगे (साहित्यिक) आनंद शिंदे(कला)
शिवसेना - उर्मिला मातोंडकर(कला), नितीन बानगुडे-पाटील(साहित्यिक), विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी
आक्षेप असणारी नावं?
सचिन सावंत, काँग्रेस
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेस
नितीन बानगुडे पाटील, शिवसेना
पाहा व्हिडीओ -