ऑनलाइन लोकमत/नम्रता फडणीस
पुणे, दि. 18 - प्रसंग 1
कुटुंबात नवीन पाहुणा आलाय, सगळे मस्त आनंदात आहेत पण आनंद होण्याऐवजी माझी चिडचिडच जास्त होत आहे. काय होतंय समजत नाही. बाळ रडतंय पण त्याला दूध पाजण्याची, हातात घेण्याची इच्छाच होत नाही, एकसारखी भीती वाटत राहाते, मात्र नवरा आणि सासू सांगतात की अगं होत असं तू घे त्याला, बोलत जा त्याच्याशी सगळं कसं छान होईल, ती आपल्या मैत्रिणीला व्यथा सांगत होती.
प्रसंग 2
अर्ध्या-अर्ध्या तासाने तिला दूध पाजावं लागतंय, मला काही लाईफच उरलेली नाही, रात्री पण म्हणावी तशी झोप मिळत नाही, उगाच चान्स घेतला मी, तुमचं बर आहे तुम्ही बाहेर फिरा मी सांभाळते तिला, असं वाटत निघून जावं एकदाचं, अशा नकारात्मक भावनेने तिला ग्रासले होते आणि तिची एकसारखी चिडचिड पाहून कुटुंबातले सगळे वैतागले होते.
सगळं छान चाललेले असूनही ती असं का वागत आहे, याचे कोडे कुणालाच उलगडत नाही. ‘हे बाळ मी सांभाळू शकणार नाही; त्याला कुठेतरी सोडून येते म्हणजे एकदाची सुटेन’ अशा विचारांनी आनंददायी मातृत्व वेदनेमध्ये परावर्तित होते कधीकधी ही मानसिक अवस्था इतक्या पराकोटीपर्यंत जाते की आत्महत्येचा मार्ग पत्करला जातो. हडपसर मध्ये एका महिलेने याच कारणास्तव आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. प्रसुतीनंतरचे हेच नैराश्य मातृत्वामध्ये बाधा ठरत आहे. या मानसिकतेमुळे कितीतरी महिला मातृत्वाचा आनंद लुटू शकत नाही. प्रसुतीनंतर अशाप्रकारे नैराश्याच्या गर्तेत जाणा-या महिलांचे प्रमाण हे 25 टक्के असल्याचे समोर आले आहे.
मातृत्वं हे खरंतर निसर्गदत्त वरदान. बाळाच्या आगमनाने आईच्या आयुष्याला एक परिपूर्णता लाभते, मानसिक आणि शारीरिक बदल स्वीकारताना एका जीवाला आकार देण्याची जबाबदारी तिच्यावर असते; पण जेव्हा या वरदानाचे ओझे वाटायला लागते, तेव्हा मातृत्वाबदद्दल नकारात्मक भावना मनात घर करू लागतात. त्याला इजा पोहोचविण्यापासून ते स्वत:ला संपवण्यापर्यंतची पाऊले महिलांकडून उचलली जातात, ही मानसिक अवस्था म्हणजे एक जैविक आजार आहे. ज्याला ‘पोस्ट पार्टल डिप्रेशन’ असे म्हटले जाते परंतु हा एक मानसिक आजार आहे, जो वेळीच उपचार घेतल्यानंतर नक्कीच बरा होऊ शकतो आणि मातृत्व नक्कीच सुखकर होऊ शकते, मात्र या आजाराविषयी अजूनही महिलांमध्ये अज्ञान असल्याने मातृत्वासारख्या आनंदादायी क्षणापासून त्या वंचित राहात आहेत.
प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निकेत कासार यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्रसुतीनंतर उद्भवणा-या या मानसिक आजाराबददल माहिती दिली. प्रसुतीनंतर साधारपणे तीन प्रकारचे मानसिक आजार उद्भवतात, त्यामध्ये पोस्ट पार्टल ब्लूज’, ‘ पोस्ट पार्टल डिप्रेशन’ आणि पोस्ट पार्टल सायकोसिस’ यांचा समावेश आहे. पोस्ट पार्टल ब्लूजमध्ये बेचैनी, चिडचिड, बाळाला अ़ँडजस्ट करून घेताना येणा-या अडचणी असा सामना करावा लागतो. मात्र आठवडाभरामध्ये हा त्रास कमी होऊ शकतो. पोस्ट पार्टल डिप्रेशन मध्ये ‘बाळ माझे नाही, मी त्याचा सांभाळ करू शकत नाही, त्याला कुठेतरी सोडूनच येते’ अशा प्रकारच्या नकारात्मक विचित्र भावनांनी ग्रासले जाते. सायकोसिस ही त्याच्या पुढची स्टेप आहे. सायकोसिस आणि डिप्रेशन हे मानसिक आजार समुपदेशन आणि औषधांनी बरे होऊ शकतात. मात्र त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो. शरीरातील हार्मोंन्सच्या बदलांमुळे हा आजार उद्भवू शकतो. आईची मानसिकता लक्षात घेऊन तिला वेळीच मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याची आवश्यकता असते मात्र ग्रामीण भागांमध्ये तिला उपचारासाठी साधूमंडळी अथवा देवाच्या दारी नेले जाते आणि मग परिस्थिती खालावल्यानंतर डॉक्टरांचे दरवाजे ठोठावले जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रस्तुतीनंतरच्या मानसिक आजाराची लक्षणे
* सतत उदास राहाणे
* भूक कमी लागणे किंवा अति भूक लागणे
* नकारात्मक भावना
* आत्महत्येचे विचार मनात येणे
* मूड सातत्याने बदलणे
* विचित्र वागणूक
* मनात सातत्याने शंका येणे
हा आजार टाळण्यासाठी काय कराल?
* सुदृढ जीवनशैली विकसित करणे
* गरोदरपणात मानसिक ताणतणावापासून दूर राहाणे
* मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष्य केंद्रीत करणे
* जमल्यास डायरी लिहिणे
गरोदरपणात सहा वेळा अँडमिट झाले होते. खूप त्रास होत होता. पोटातील पाणी कमी झाल्याने सिझर करावे लागले. बाळाला घरी गेल्यानंतर त्याला काविळ झाल्याचे कळले. बाळाला रूग्णालयात ठेवायला लागल्यामुळे स्तनपान करता येत नव्हते, खूप चिडचिड व्हायची, घराबाहेर पडता येत नसल्यामुळे पूर्णत: हेल्पलेस झाले झाल्याची भावना आली होती. जीवन नैराश्याने ग्रासले होते. याविषयी मैत्रिणीशी बोलले. मग मानसोपचार तज्ञांकडे जायचा निर्णय घेतला. त्यांनी ही पोस्ट पार्टल डिप्रेशनची लक्षणे असल्याचे सांगितले आणि मग उपचार सुरू झाले. काहीप्रमाणात आता मानसिकदृष्ट्या सावरू लागली आहे- प्राची प्रतिभा शिरीष
पूर्वीपासून ज्या महिला नैराश्यावर उपचार घेत आहेत. मात्र गरोदरपणानंतर अचानक उपचार घेणे त्यांनी थांबविले आहे अशा महिलांना प्रसुतीनंतर मानसिक आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता अधिक आहे - डॉ. निकेत कासार, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ
‘प्रसुतीनंतर ‘पोस्ट पार्टल ब्लू आणि पोस्ट पार्टल डिप्रेशन’ हे मानसिक आजार उद्भवू शकतात. मात्र पूर्वीच्या तुलनेत या आजारांचे प्रमाण फार कमी आहे. आई होण्याचा निर्णय घेताना प्रसुतीपूर्वी महिलेची मानसिक तयारी होणे गरजेचे आहे, यासाठी माहितीपर कार्यक्रम घेतले जातात. प्रसुतीनंतर एखाद्या महिलेमध्ये काही मानसिक लक्षण दिसली तर मानसोपचार तज्ञांचा नक्कीच सल्ला घेतला जातो
- डॉ. दिलीप काळे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ