कणकवली : फोंडा घाटात बुधवारी सकाळी मोठी दरड कोसळली. गणेशोत्सवाच्या आदल्याच दिवशी दरड कोसळल्याने वाहनधारकांना मनस्ताप झाला. तब्बल दोन तास मार्ग पूर्णत: ठप्प झाला होता. तर त्यापुढील दोन तास एकेरी वाहतूक सुरू होती. चार तासांनी मार्ग पूर्ण मोकळा करण्यात आला. फोंडा घाटात बुधवारी सकाळी ८.३०च्या सुमारास मोठी दरड कोसळली. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या. ८.३० पासून १०.३० पर्यंत घाटमार्गातील वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी आणून दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. १०.३० वाजता एकेरी वाहतूक सुरू झाली. पुढील दोन तासांत मार्ग पूर्ण मोकळा करण्यात आला. चार तासांनंतर मार्ग पूर्ण मोकळा झाला. मुंबई-गोवा महामार्ग टाळून पुणे-कोल्हापूर-फोंडामार्गे अनेक वाहनधारक गणेशोत्सवात येतात. मुंबई आदी ठिकाणाहून गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांना दरड कोसळल्याने मनस्ताप सहन करावा लागला. पावसाने पुन्हा जोर धरल्याने दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
फोंडा घाटात दरड कोसळल्याने अडथळा
By admin | Published: September 17, 2015 1:55 AM