आयत्या वेळी मार्ग बदलल्यान न्यू भूज गाडी 15 तास उशीरानेपुणे : पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते पालघर या मार्गा दरम्यान रविवारी मध्यरात्री मालगाडीचे डब्बे घसरल्याने उत्तर भारतातून पुण्यात येणाऱ्या तसेच जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे मंगळवारी नियोजन कोसळले. मात्र, या घटनेचा सर्वाधिक फटका सोमवारी पुण्यातून गुजरातला जाणा-या प्रवाशांना बसला. या दुर्घटने मुळे पुणे-न्यू भूज ही गाडी आयत्या वेळी कर्जत मार्गे भुसावळवरून गुजरातला नेण्यात आली. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा तब्बल १५ तास उशीराने ही गाडी भूजला पोहचली अचानक मार्ग बदलण्यात आल्याने अनेक प्रवाशांना कर्जत मध्येच गाडी मिळेल ते वाहन घेऊन आपला प्रवास पुर्ण करावा लागला.
पुण्याहून दर सोमवारी संध्याकाळी सात वाजून ५० मिनिटांनी गाडी क्रमांक ११०९२ न्यू भूज ही गुजरातसाठी रवाना होते. सोमवारी देखील ही गाडी आपल्या नियमित वेळेत रवाना झाली. कर्जत-कल्याण-दिवा आणि वसईमार्गे गुजरात हा या गाडीचा ठरलेला मार्ग. मात्र, अपघातामुळे पश्चिम रेल्वेवरील मार्गात बदल झाल्याने ही गाडी दौंड-मनमाड-भुसावळ मार्गे घेवून जाणे अपेक्षित होते. मात्र, अधिका-यांच्या मनमानी कारभार तसेच रेल्वेच्या ढीसाळ यंत्रणेमुळे तसे न करता वेळेत निघालेली ही गाडी कर्जत-पनवेल-कल्याण-नाशिक-मनमाड-भुसावळमार्गे नेण्यात आली. गाडी पनवेलवरून घेवून गेल्याने ३५ मिनिटांऐवजी सुमारे दोन तास उशीर झाला. तसेच पुढे देखील ल ही गाडी अशीच फिरवत नेल्यास तब्बल ३५ तासानंतर ही गाडी गुजरातला पोहचली.
इतर वेळी १९ तासांत ही गाडी गुजरातला जाते. तर या गाडीचा मार्ग अचानक बदलण्यात आल्याने कर्जतच्या पुढे वापी तसेच वसई मार्गे गुजरातकडे जाणा-या अनेक प्रवाशांना ही गाडी सोडून देत प्रवासासाठी इतर वाहनांचा रस्ता धरावा लागला. दरम्यान रविवारी झालेल्या या अपघाताचे परिमाण मंगळवारी देखील जाणवले. देशभरातून पुण्यात येणाऱ्या अनेक उशीराने दाखल झाल्या. त्यामुळे मंगळवारी या गाड्यांना मार्गस्थ होण्यासाठीही तीन ते चार तासांचा उशीर झाला. इंदौर-पुणे, अहमदाबाद -पुणे-दुरंतो अशा गाड्यांचा त्यात समावेश आहे. या दोन्ही गाडया नियमित वेळापेक्षा तीन ते चार तास उशीराने रवाना करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. =====================
पश्चिम रेल्वेवर अपघात झाल्याने या न्यू भूज गाडी दौंड वरून भुसावळ आणि गुजरातला घेऊन जाणे सोयीस्कर होते. त्यानंतरही ही गाडी कर्जत मार्गे नेण्यात आली. त्यानंतर पुन्हा कर्जत मध्ये अचानक तिचा मार्ग बदलण्यात आला. त्यामुळे जवळपास 15 तास ही गाडी उशीराने पोहचली. अशा प्रकारे प्रवाशांची गैरसोय अपेक्षीत नाही.त्यामुळे रेल्वेकडून तत्काळ या प्रकारांना आळा घालण्याची गरज आहे. -हर्षा शहा (रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा)