ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.10 - सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळाच्यावतीने शब्दगंध हा स्वरचित मराठी कवितांना वाहिलेला व गेली 11 वर्षे कार्यरत असलेला मासिक उपक्रम यंदा 15 ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे. सिंगापूर येथे होणा-या या कार्यक्रमास महाराष्ट्रातील साहित्यिकांची उपस्थिती राहणार आहे.
शब्दगंधीचे कविता वाचन, ज्येष्ठ कवियत्री, लेखिका व मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड यांचे सुखाचा शोध या विषयावरील कथाकथन, सुप्रसिद्ध कवियत्री, लेखिका व मुलाखतकार गौरी कुलकर्णी यांचे कवितेतील निसर्ग यविषयावरील मार्गदर्शन, लेखिका, कवियत्री रेखा नार्वेकर यांचे ज्ञानेश्वरीतील काव्य सौंदर्य, कवियत्री-प्रकाशिका लता गुठे यांचे कविता वाचन, लेखक प्रकाश कुलकर्णी यांचे कथा अभिवाचन असा हा भव्य कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती या कार्यक्रमाच्या समन्वयक व लेखिका मोहना कारखानीस यांनी दिली आहे. त्यानतंर कोजागिरीचा शानदार कार्यक्रम होईल. यात सहभागी होऊ इच्छिणा-यांनी अधिक माहितीसाठी व उपस्थितीठी ई-मेल shabdagandha@mmsingapore.org वर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर कार्यकारिणीने केले आहे.