मुंबई : राज्यातील उन्हाचा कडाका वाढत असून, सर्वच शहरांच्या कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे. शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश नोंदविण्यात आले असतानाच, रविवारी दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहराचे कमाल तापमान ३७ अंश नोंदविण्यात आले, तर मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश नोंदविण्यात आले आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी मुंबईच्या कमाल तापमानात २ अंशांची घट झाली. कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली असली, तरी उकाड्याने मात्र मुंबई हैराण झाले आहेत.
मागील २४ तासांत गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकणसह गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत तर कोकण, गोव्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. १५ ते १६ आॅक्टोबर दरम्यान संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १७ ते १८ आॅक्टोबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. सोमवारसह मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे३६, २४ अंशाच्या आसपास राहील, शिवाय आकाश निरभ्र राहील.