मुंबई : विधानसभा निवडणुकीदरम्यान तापललेले राजकीय वातावरण आता निवळत असले तरीदेखील आॅक्टोबर हीटने राज्याला घाम फोडला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे कमाल तापमान सरासरी ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, जोवर उत्तरेकडून थंड वारे वाहण्यास सुरुवात होणार नाही तोवर नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.मान्सून आता देशातून पूर्णत: गेला असून, ईशान्य मोसमी पावसाचे देखील उत्तर पूर्व भारतात आगमन झाले आहे. मात्र उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे थंड वारे वाहण्यास अद्याप आरंभ झालेला नाही. परिणामी राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. परिणामी आॅक्टोबर हीटचे चटके बसत असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे.मराठवाड्यातील काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचितशी वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
आॅक्टोबर हीटचा तडाखा!
By admin | Published: October 21, 2014 4:18 AM