- तापमान ३२ अंशावर
मुंबई : देशाच्या उत्तर भागातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असतानाच आता राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. आॅक्टोबरऐवजी सप्टेंबर महिन्यातच पडलेल्या तापदायक उन्हामुळे नागरिकांना जोरदार झळा बसू लागल्या आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी मान्सूनने राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्याची घोषणा केली आहे. राजस्थानच्या पश्चिम भागातून परतलेल्या मान्सूनची सीमा सोमवारी कायम असल्याचेही खात्याचे म्हणणे आहे.सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा सुरू झालेला परतीचा प्रवास उत्तरार्धात संपत असल्याने सर्वसाधारणरीत्या आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेला प्रारंभ होतो़ आणि जोवर उत्तरेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहण्यास सुरुवात होत नाही तोवर आॅक्टोबर महिना नागरिकांचा घाम काढतो.परंतु या वर्षी मान्सूनने आपला परतीचा प्रवास लवकर सुरू केला असल्याने राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल तापमान ३२ आणि किमान तापमान २८ अंशावर नोंदविण्यात येत आहे. शिवाय वातावरणही कोरडे असल्याने उष्णतेची दाहकता अधिक जाणवत आहे. (प्रतिनिधी)