मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आमदार अपात्रतेबाबत काय कार्यवाही केली हे सांगण्यासाठी अवघे चार दिवस बाकी असताना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानभवनात विधी विभाग तसेच वकिलांशी सल्लामसलत केली. त्यानंतर नार्वेकर गुरुवारी अचानक दिल्लीला रवाना झाले. पक्षश्रेष्ठी आणि खटल्याशी संबंधित ज्येष्ठ विधिज्ञांशी चर्चा करण्यासाठी ही दिल्ली भेट असल्याची चर्चा आहे.
सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात अध्यक्षांची बाजू मांडली असली तरी आता नव्या निर्देशानुसार न्यायालयासमोर कसा अहवाल मांडावा याबाबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीत पाेहोचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अध्यक्षांनी मात्र याचा इन्कार केला आहे. आपला दिल्ली दौरा पूर्वनियोजित होता.
अध्यक्षांनी शिवसेना कुणाची या मुद्यावर सुनावणीची दिशा ठरवली आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या काळात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठविण्यात येणार असल्याचे समजते. मात्र, असे केल्यास कायदेशीर पेच निर्माण होईल का याबाबतही अध्यक्ष दिल्लीत चर्चा करतील.
संगणकाने निश्चित केलेल्या कामकाजाच्या तारखांनुसार सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणी (ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू विरुद्ध विधानसभा अध्यक्ष) ३ ऑक्टोबर रोजी, तर पक्षाचे नाव आणि चिन्ह (उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे) प्रकरणी १० ऑक्टोबर रोजी लागोपाठच्या दोन मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे.बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे या दोन्ही प्रकरणांची सुनावणी होणार आहे.