नेरळ : कर्जत तालुक्यात महिला बालविकास विभागाने गरोदर मातांना समाजात सन्मान देण्याचा प्रयत्न केला. नेरळ परिसरातील या विभागाने पुढाकार घेऊन १५० गरोदर महिलांची ओटी भरली आणि त्यांना डोहाळे जेवण देताना त्यांच्या पोटात वाढत असलेल्या बाळासाठी डोहाळे गाणी सादर करून गरोदर मातांना आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्र माला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या नेरळच्या सरपंच सुवर्णा नाईक यांनी मुलगी जन्माला आल्यास नेरळ ग्रामपंचायतीमधील नेरळ परिवर्तन विकास आघाडी त्या नवजात मुलींचा विमा उतरवेल, असे आश्वासन दिले.गरोदर मातांचे लाड आणि कोडकौतुक त्या महिलेच्या कुटुंबात होत असते. तसेच कौतुक समाजातील असंख्य महिलांच्या उपस्थितीत झाले तर ती गरोदर माता प्रचंड खूश राहू शकते, परिणामी त्या आनंदी वातावरणामुळे त्या गरोदर मातेच्या पोटी जन्मणारे बाळ देखील सुदृढ जन्माला येऊ शकते, असा विश्वास कर्जत तालुक्यात कार्यरत असलेल्या एकात्मिक बालविकास विभागाच्या नेरळ भागात काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांना होता. बालविकास विकासाच्या पर्यवेक्षिका जयश्री कांबळे, आरती तेलखडे, कार्तिकी भिंगारे यांनी सूचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्या प्रस्तावाला नेरळ ग्रामपंचायतीने सकारात्मक प्रतिसाद देऊन नेरळच्या बापूराव धारप सभागृहात गरोदर मातांसाठी आगळावेगळा कार्यक्र म आयोजित केला. १५० हून अधिक गरोदर मातांचे एकावेळी डोहाळे जेवण यावेळी करण्यात आले. गरोदर मातांची ओटी नेरळच्या सरपंच सुवर्णा नाईक, माजी सरपंच राजश्री कोकाटे, सदस्य संजीवनी हजारे आदींनी भरली. उपस्थित महिलांनी डोहाळे गाण्यांवर ठेका देखील धरला. (वार्ताहर)>गरोदरपणात काळजी घ्यादुसऱ्या सत्रात नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गवळी यांनी गरोदर मातांना गरोदरपणाच्या काळात घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. गरोदरपणी आहार कोणता असावा याची माहिती देतानाच व्यायाम करण्याचा सल्ला दिला. सरपंच सुवर्णा नाईक यांनी मुलगी जन्मल्यास त्या मातांच्या कुटुंबाला आणि त्या नवजात मुलीचा विमा नेरळ परिवर्तन विकास आघाडी उतरविल, असे आश्वासन दिले.
कर्जतमध्ये १५० गरोदर महिलांची भरली ओटी
By admin | Published: July 22, 2016 2:08 AM