मनोज ताजने
गडचिरोली - तब्बल दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करीत पूर्व विदर्भाच्या जंगलात वर्षभरापासून रेंगाळत असलेले ओडिशाच्या जंगलातील हत्ती येथून काढता पाय घ्यायला तयार नाहीत. तब्बल २३ लहान-मोठ्या हत्तींचा हा कळप पोषक वातावरणामुळे पूर्व विदर्भात स्थिरावण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. भरपूर चारा आणि पाणी (तलाव) असलेल्या भागात या हत्तींचा मुक्काम असतो. दिवसा जंगलात आराम करणे आणि रात्रीच्या अंधारात चरण्यासाठी बाहेर पडणे असा त्यांचा उपक्रम आहे. धानपिकाची चटक लागलेल्या या हत्तींसाठी पूर्व विदर्भाचा प्रदेश पोषक ठरत आहे.
‘हुल्ला पार्टी’ चमूकडून मॉनिटरिंगया हत्तींवर पाळत ठेवण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी पश्चिम बंगालमधील ‘सेझ’ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेला ऑगस्ट २०२२ मध्ये पाचारण केले. या संस्थेचे सहा लोक (हुल्ला पार्टी) सध्या या हत्तींवर पाळत ठेवून आहेत. हत्तींनी गावात शिरण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मशाली पेटवून रोखणे किंवा गावकऱ्यांना सतर्क करण्याचे काम ही हुल्ला पार्टी करत आहे.
हत्तींना हुसकावणे शक्य आहे का? सामान्य नागरिकांना वाटते त्या पद्धतीने या जंगली हत्तींना हुसकावून लावता येत नाही. वनविभागाच्या नियमांतही ते बसत नाही. त्यांचा मार्ग अडविण्याचा जास्त प्रयत्न केल्यास ते आणखी आक्रमक होऊन जास्त नुकसान करू शकतात. हे हत्ती कळपाने राहत असल्यामुळे बऱ्यापैकी शांत आहेत. त्यातील काही हत्ती विखुरल्यास ते आक्रमक होऊ शकतात, असे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले.
हत्तींना भरपूर चारा आणि पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात त्यांना दाह शांत करण्यासाठी पाण्यात बसावे लागते. पूर्व विदर्भात पोषक वातावरण असले तरी हे हत्ती किती दिवस इकडे राहतील याबद्दल निश्चितपणे सांगता येणार नाही. तूर्त नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन त्यांच्या वाटेला जाऊ नये. - डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक, गडचिरोली
ऑगस्ट महिन्यात पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या या हत्तींनी दीड महिन्यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातून चाऱ्याचा आस्वाद घेऊन आता भंडारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. सध्या साकोली परिसरात त्यांचे वास्तव्य आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये या हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेकडील मुरुमगाव वनपरिक्षेत्रात प्रवेश केला. कुरखेडा, देसाईगंज तालुक्यांतून वैनगंगा नदी ओलांडत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण तिकडे पोषक वातावरण न दिसल्याने काढता पाय घेऊन मार्च २०२२ मध्ये पुन्हा छत्तीसगड गाठले. ओडिशात ‘मयूर झरना’ हे हत्तींसाठी राखीव जंगल आहे. त्याच भागातून काही दिवस झारखंडमध्ये जाऊन हे हत्ती २०१४ मध्ये छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात स्थिरावले होते. जवळपास सात वर्षे त्यांचे वास्तव्य छत्तीसगडच्या जंगलात होते.