ऑनलाइन लोकमत
करमाळा, दि. 1 - महाराष्ट्र दिनानिमित्त तहसिल कार्यालयात ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेल्या आमदार नारायण पाटील यांना शेतक-यांना घेराव घातला. कुकडी प्रकल्पातील पाण्याचे उन्हाळ्यातील आवर्तन करमाळा तालुक्यास मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल-कोलते व मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी पाणी मागणा-या रश्मी बागल यांच्यावर हात उगारुन अर्वाच्य व शिवराळ भाषा वापरल्याने पाटील यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात अदखल पाञ गुन्हा दाखल झाला आहे.
बागल गटाचे नेते व मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी कुकडी प्रकल्पातील पाणी,उजनी धरण काठावरील शेती पंपाना विजेचा अपुरा व कमी दाबाने होणारा पुरवठा याप्रश्नी नारायण पाटील यांना १ मे,महाराष्ट्र दिनी जाब विचारण्यासाठी घेराव आंदोलन करण्याचा इशारा गेल्या आठवड्यात दिला होता.
आज १ मे,महाराष्ट्र दिना निमित्त तहसिल कार्यालयाच्या कवायत मैदानावर आ.नारायण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर नारायण पाटील यांना पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर आ.पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांना प्रथेनुसार तहसिल कार्यालयात चहापाण्यासाठी तहसिलदार संजय पवार यांना निमंञित केल्यानंतर जात असताना तहसिल कार्यालयाच्या वेशीसमोर रश्मी बागल-कोलते,दिग्विजय बागल यांच्यासह शेतक-यांनी घेराव कुकडीच्या अवर्तनाचा जाब विचारला. यावेळी आमदार पाटील यांनी निवेदन घेऊन तुम्ही कारखान्याचे काय केले? असा सवाल केला असता पाटील व रश्मी बागल-कोलते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
पाटील यांनी दुष्काळात पाणी मागणी करणा-यांचा व महिलांचा अपमान केला असल्याने पाटील जोपर्यंत आमची माफी मागत नाही तो पर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असे दिग्विजय बागल यांनी सांगून तहसिल कार्यालयासमोर रश्मी बागल-कोलते यांच्यासह कार्यकर्ते ठाण मांडून आहेत. त्यानंतर तहसिल कार्यालयातून पाटील बाहेर आल्यानंतर दिग्विजय बागल यांनी पुन्हा त्यांना पाण्याचा जाब विचारल्यावर बागल समर्थकांनी नारायण पाटील यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.यावेळी पाटील यांनी चिडून अर्वाच्य भाषा वापरली. यावेळीही दिग्विजय बागल व पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली.
नारायण पाटील यांनी आपणास व कार्यकर्त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन दमबाजी केल्याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी नारायण पाटील यांच्याविरोधात अदखलपाञ गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आ.नारायण पाटील व त्यांचे सुरक्षा रक्षक क्षीरसागर यांनी रश्मी बागल, दिग्विजय बागल व इतर कार्यकर्त्यांनी आपणास ध्वजारोहण प्रसंगी बेकायदा जमाव जमवून अडवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची फिर्याद दिली आहे.