मुंबई: दोन दिवस रस्त्यांची झाडलोट करून समाजसेवा करणे आणि विधी साह्य सेवेला ५० हजार रुपयांची देणगी देण्याच्या अटींवर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील पाच तरुणांविरुद्ध नोंदविलेला विनयभंगाचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला.या आरोपी तरुणांनी केलेल्या याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. अमजद सैयद यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात हा आदेश दिला. या तरुणांनी येत्या ३ नोव्हेंबर रोजी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या वॉर्ड आॅफिसरपुढे हजर होऊन ते सांगतील त्याप्रमाणे साफसफाईचे काम करायचे आहे. यानुसार आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहून गुन्हा रद्द करण्याचा औपचारिक आदेश ७ डिसेंबर रोजी दिला जाईल.फिर्यादी आणि आरोपी यांच्यात समेट झाल्यावर न्यायालयाने अशा प्रकारे समाजसेवेचा आदेश देण्याची अलिकडच्या काळातील ही दुसरी वेळ आहे. मध्यंतरी ठाण्याच्या एका प्रकरणात असा आदेश दिला होता.आरोपी मुले १९ ते २२ वयोगटातील आहेत व त्यांनी केल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला आहे. शिवाय या प्रकरणातील वैशिष्ठ्यपूर्ण तथ्ये पाहता हा एकूणच समाजाविरुद्धचा व्यापक गुन्हा असल्याचे आम्हाला वाटत नसल्याने हा ‘एफआयआर’ रद्द करण्यास आम्ही राजी होत आहोत, असे खंडपीठाने नमूद केले.एका १७ वर्षांच्या मुलीने केलेल्या फिर्यादीवरून बदलापूर पोलिसांनी गेल्या २५ सप्टेंबर रोजी बदलापूर पोलिसांनी या पाचजणांविरुद्ध भादंवि कलम ३५४ (महिलेचा विनयऊंग करणे), ३२३ (जाणूनबुजून इजा करणे), ५०७ (दमदाटी करणे) व १४९ (दंगामस्ती करणे) अन्वये ‘एफआयआर’ नोंदविला होता.ज्या दोन मुलींचा विनयभंग झाल्याची तक्रार होती त्यांच्यापैकी एकीची या पाचजणांपैकी एकाशी ओळख होती. तो तिच्याबरोबर शाळेत शिकायचा. या मुलाच्या एका मित्राला अपघात झाला होता व त्याच्यावर उपचार सुरु होते. तक्रारदार मुलगी आपल्या मैत्रीणीसोबत या जखमी मुलाला भेटायला गेली तेव्हा तिच्या ओळखीच्या मुलाने तिच्या मैत्रीणीच्या त्या जखमी मुलाशी असलेल्या संबंधांत आक्षेप घेतला व त्याने तिला ताबडतोब भेटायला यायला सांगितले. या दोन मुली त्याला भेटायला गेल्या तेव्हा तेथे त्याचे इतर मित्रही होते व तेव्हा वरील प्रकार घडला. (विशेष प्रतिनिधी)मुलीच्या आईचे प्रतिज्ञापत्रतक्रारदार मुलीच्या आईने प्रतिज्ञापत्र करून न्यायालयास सांगितले की, दोघांमध्ये समेट झाला असल्याने प्रकरण मिटविले जावे. माझ्या मुलीला पोलीस ठाण्यात व कोर्टात खेटे घालायला लागू नयेत म्हणून आणि आरोपींनी पश्चात्ताप व्यक्त केला असल्याने त्यांच्याविरुद्धचा ‘एफआयआर’ रद्द करण्यास आपली हरकत नाही.
समाजसेवेच्या अटीवर गुन्हा रद्द
By admin | Published: October 29, 2016 11:56 PM