Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहिणाऱ्या एका डॉक्टरवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याची घटना घडली. नाशिकमधील सिडको भागात असलेल्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घुसून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरला माफी मागायला लावली.
डॉ. विजय गवळी असे डॉक्टरचे नाव असून, ते आयुर्वेद वैद्य आहेत. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक करत पोस्टचा निषेध केला. त्याचबरोबर क्लिनिकमध्ये एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा दिल्या. या सगळ्या प्रकाराचा संभाजी ब्रिगेड व्हिडीओही बनवला आहे.
मनोज जरांगेंबद्दल पोस्ट; डॉक्टरने काय म्हटलं?
सोशल मीडियावर मनोज जरांगेंबद्दल विजय गवळी यांनी माफी मागितली आहे. "मी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाच आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर त्याबद्दल क्षमस्व", असे डॉक्टर म्हणाले.
डॉक्टरला संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते काय म्हणाले, "तुमचा अपमान करण्याचा आमचा उद्देश नाही. तुम्ही आदरार्थी आणि वडिलधारी आहात. तुम्ही असं करणं चुकीचं आहे. आमच्या भावना तीव्र आहेत. आम्ही मराठा म्हणून जगण्या-मरण्याची लढाई लढतोय. तुमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीकडून असं अपेक्षित नाही."
डॉ. विजय गवळी यांनी मनोज जरांगेबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. ज्यात त्यांनी मनोज जरांगेंचे सगेसोयरे मुस्लीम असल्याचा उल्लेख केला होता. याच पोस्टमुळे हा सगळा प्रकार घडला.