मुंबई - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. या लिखाणावरून संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करुन निषेध व्यक्त केला. आता या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आक्षेपार्ह मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश दिलेत. त्याचसोबत महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची गय करणार नाही असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'इंडिक टेल्स' या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच 'इंडिक टेल्स' वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीने केली टीकासावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी आम्ही पोलीस आयुक्तांना केली आहे. मुंबई पोलिसांनी अनेक प्रकरणात काही तासात कारवाई केली आहे त्यामुळे आता या प्रकरणात देखील लक्ष घालून कडक कारवाई केली पाहिजे जर कडक कारवाई झाली नाही तर यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रात करू असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला. तर महापुरुषांवर गरळ ओकनाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील पोलीस आयुक्तांच्या भेटीवेळी केली.