राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. ज्यावेळी मंत्रिपदाचा कार्यभार स्विकारला, त्यावेळी तुम्हाला आम्ही वर्षाला 25 कोटी रुपये देतो असे सांगत काही एजंट माझ्याजवळ आले होते, असे विधान दीपक केसरकर यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दीपक केसरकर कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केले आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, "मी जेव्हा माझ्या डिपार्टमेंटचा कार्यभार सांभाळला त्यावेळला माझ्याकडे असेच एजंट लोक आले होते. आम्ही तुम्हाला वर्षाला 25 कोटी रुपये देतो. तुम्ही ज्या शाळांना परवानगी देता, त्या आम्ही आणलेल्या शाळांना परवानगी द्या. पण, मी असे केले नाही. परवानग्यांवर आम्ही सह्या करतो. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रम करतो. फाईल आणि गुलाबाचे फुल देतो. मात्र हे असे कोट्यवधी रूपये कुणाला नको असतात असे बिल्कुल नाही. परंतु ही आमची काम करायची पद्धत नाही."
याचबरोबर, "आमची काम करायची पद्धत जनतेसाठी काम करायची पद्धत आहे, नाहीतर त्यावेळी ती ऑफर स्वीकारली असती. ॲडमिशनसाठी तशी ऑफरही आली होती. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आम्ही काम करतो, मुंबई ही मायानगरी आहे. मुंबई हे कमर्शियल भारताचे कॅपिटल आहे. म्हणून ते आमच्याशी संबंधित असतात, असे समजू नका, कुठल्याही एजंटला कोणीही बळी पडू नका, त्या एजंटांचे काय करायचे, त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहोत तुम्ही फक्त आम्हाला नाव द्या हे लोक असे करतात म्हणून सांगा आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो", असे अश्वासनही दीपक केसरकर यावेळी दिले.
दरम्यान, दीपक केसरकर यांनी एजंटांच्या 25 कोटीचे वक्तव्य केले असले तरी त्याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारचे एजंट मंत्रालयाजवळ फिरत असल्याचा आरोप केला होता. तसेच, जनतेच्या घामाचा पैसा कंत्राटदारांना देऊन उधळपट्टी सुरु आहे. त्या कंत्राटदार आणि एजंटबरोबर डिलिंग होत असल्याचा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केला होता. यानंतर दीपक केसरकर यांनीही खळबळजनक विधान करुन एकप्रकारे प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यातील एकही शाळा बंद करणार नाही : केसरकरशासनाकडून शाळांचे सर्वेक्षण सुरू झाले की वाड्या, वस्त्या, दुर्गम भागातील शाळा बंद करणार, ही आवई उठविणे चुकीचे आहे. एकही शाळा बंद केली जाणार नाही. उलट इंग्रजी शाळांसारखी सुविधा मराठी शाळांमध्ये निर्माण करून मराठी शाळा वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिली. तसेच, ते म्हणाले, नर्सरी, ज्युनिअर, सिनिअर, पहिली आणि दुसरी ही पाच वर्षे प्री-प्रायमरीमध्ये घेतली जाणार आहेत.