कोल्हापूर - Mahavikas Aghadi on Sambhaji Chhatrapati ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यात युवराज छत्रपती संभाजीराजे हेदेखील कोल्हापूरातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यात महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंना एक अट घालण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाविकास आघाडीतील ३ प्रमुख पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश केल्यास केल्यास संभाजीराजे यांना उमेदवारी पक्की असल्याचे बोलले जात आहे. संभाजीराजेंना सोबत घेण्याबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत आहे. परंतु संभाजीराजे यांचा स्वत:चा स्वराज्य नावाचा पक्ष आहे. ते राज्यसभेचे माजी खासदार आहेत. मागील राज्यसभा निवडणुकीवेळी संभाजीराजे यांनी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. परंतु शिवसेनेने काही अटी घातल्या होत्या त्या संभाजीराजेंनी मान्य केल्या नव्हत्या. आता पुन्हा लोकसभेसाठी संभाजीराजे इच्छुक आहेत. महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे. परंतु त्यापूर्वी मविआनं संभाजीराजेंना अट घातली आहे.
ही अट म्हणजे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा काँग्रेस यापैकी एका पक्षात संभाजीराजेंनी जाहीर प्रवेश केला तर म्हणजे स्वराज्य पक्ष विलीन करून त्यांनी एका पक्षात प्रवेश केला तर संभाजीराजेंना निश्चित उमेदवारी मिळू शकते. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचे यावर एकमत झालेले आहे. संभाजीराजे यांना मविआकडून कोल्हापूरची लोकसभा जागा दिली जाऊ शकते अशी माहिती आहे. यापूर्वी संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती यांचेही नावही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चर्चेत होते. मात्र मविआकडून ही ऑफर संभाजीराजेंना दिली असून याबाबत संभाजीराजे काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये ही जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु उमेदवारांबाबतच्या चर्चेला मात्र चांगलीच धार आली आहे. त्यात अचानक माजी खासदार संभाजीराजे यांचे नाव पुढे सरकले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचा सरप्राइज चेहरा तेच असावेत, अशाच हालचाली आहेत. सद्य:स्थितीत संभाजीराजे यांच्यासमोरही अन्य चांगला राजकीय पर्याय उपलब्ध नाही. त्यांनी स्वराज्य संघटना कम पक्ष काढला असला तरी तो चालविणे तितके सोपे नाही. या पक्षाच्या माध्यमातून राज्यभर काही उमेदवार उभे करून दबाव गट तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु कारणे काहीही असली तरी त्यांच्या या संघटनेला बळकटी येण्यापूर्वीच बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजेंनी शिवसेनेच्या उमेदवारीस नकार दिला होता. त्यातून पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. परंतु शरद पवार पुढाकार घेऊन हा गुंता सोडवू शकतात. सध्या याठिकाणी शिवसेनेचे संजय मंडलिक हे खासदार आहेत जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेत.