ऑनलाइन लोकमत -
शिर्डी, दि. 25 – शिर्डी साईबाबा मंदिरातील दानपेटीत सोनं, चांदी तसंच मौल्यवान खडे मिळणं काही नवीन गोष्ट नाही. त्याचप्रमाणे जेव्हा मंदिरातील कर्मचा-यांना दानपेटीत दोन हिरेजडीत हार सापडले तेव्हा आश्चर्य वाटलं नाही. पण जेव्हा हि-याची किंमत 92 लाख असल्याचं सराफांनी सांगितलं तेव्हा मात्र त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
दानपेटीत इतकं महागडं दान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनेकदा देणगीदार अशा प्रकारची देणगी विश्वस्तांकडेच करतात. शिर्डीमध्ये फक्त भारतातूनच नाही तर जगभरातील भाविक दान करत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या देशांची चलन, नाणी दानपेटीत मिळत असतात. पैशांव्यतिरिक्त सोनं, चांदीच्या दागिन्यांनी दानपेटी भरलेली असते.
गेल्यावर्षी 1 एप्रिल ते 31 मार्चदरम्यान भक्तांनी 223 मौल्यवान खडे देणगी म्हणून दिले आहेत. या मौल्यवान हि-यांची किंमत 1 कोटी 6 लाखांपर्यंत पोहोचत आहे. यामध्ये जे हार दान करण्यात आले आहेत फक्त त्यांचीच किंमत 92 लाख आहे अशी माहिती संस्थानचे मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांनी दिली आहे.
21 एप्रिलला दानपेटी खोलण्यात आली आणि दोन दिवसानंतर त्यांचं मुल्यांकन करण्यात आलं असंही दिलीप झिरपे यांनी सांगितलं आहे. हि-यांची पाहणी करणा-या नरेश मेहता यांनी हे हिरे अत्यंत मौल्यवान असल्याचं सांगितलं आहे. त्यातील एक हिरा 6.67 कॅरेट असून दुसरा 2.5 कॅरेटचा आहे. दोन्ही हि-यांची किंमत 92 लाख होत आहे अशी माहिती नरेश मेहता यांनी दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालय समितीच्या अध्यक्षतेखाली मंदिराचा कारभार चालवला जात आहे. हि-यांचं काय करायचं ? याचा निर्णय न्यायालय घेईल अशी माहिती समितीचे सीईओ बाजीराव शिंदे यांनी दिली आहे. शिर्डी साई मंदिराची संपत्ती -
हिरे - 9.25 करोड
सोनं - 392 किलो
चांदी - 4,178 किलो
राष्ट्रीय बँकांमधील ठेवी - 1,587 करोड