लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : विरारच्या ओम साईधाम ट्रस्टने शिर्डीजवळ उभारलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिल्या. सरकारी दरानुसार या इमारतींची बत्तीस कोटींहून अधिक किंमत आहे. संस्थानच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी देणगी ठरणार आहे़डॉ़ सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखालील संस्थानचे व्यवस्थापन मंडळ या इमारतीत राज्यातील गोर-गरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आय. ए. एस. अकादमी सुरू करणार आहे़ विरारच्या ओम साईधाम मंदिर ट्रस्टने शिर्डीला येणाऱ्या पदयात्रींसाठी शिर्डीजवळ २००८ मध्ये साईपालखी निवारा उभारला आहे़ येथे पदयात्रींना निवास व भोजनाची मोफत सेवा पुरविण्यात येते़ आमदार हितेंद्र ठाकूर संस्थापक अध्यक्ष असलेल्या या ट्रस्टमध्ये काशिनाथ गोविंद पाटील, शेखर नाईक, प्रदीप तेंडोलकर, मोहन मुदलियार आदी विश्वस्तांचा समावेश आहे़ यातील पाटील (रा. कोपरी, तालुका वसई, जिल्हा पालघर) यांनी त्यांच्या नावावरील एकूण ९७८२.४४ चौ़मीटर बांधीव क्षेत्र असलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती गुरूवारी साईचरणी अर्पण केल्या़ या इमारतींची सरकारी भावाप्रमाणे सुमारे ३२ कोटी २७ लक्ष १३ हजार रूपये किंमत आहे़ या दानपत्रासाठीचे नोंदणी व मुद्रांक शुल्क १ कोटी ६३ लाख रूपये संस्थानने भरले. याशिवाय लवकरच कसारा घाटात पालखी थांबा उभारण्यासाठीही ३२ गुंठे जागा बाबांना अर्पण करणार असल्याचे तेंडोलकर यांनी सांगितले़ संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांच्या हस्ते प्रथम हे दानपत्र समाधीवर ठेऊन नंतर संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
बत्तीस कोटींच्या दोन इमारती साईबाबा संस्थानला अर्पण
By admin | Published: May 12, 2017 3:14 AM