पुणे : गावोगावी मंडल अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सातबारा उताऱ्यांचे चावडी वाचन केले जात आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. चावडी वाचनानंतर नागरिकांनी सांगितलेल्या चुका दुरूस्त केल्यानंतरही त्रुटी आढळून आल्यास संबधित अधिकाऱ्यांना दोषी धरले जाणार आहे, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. चावडी वाचनामध्ये आढळणाऱ्या त्रुटी सक्षम अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर दुरूस्त केली जात आहेत. त्याचप्रमाणे येत्या १ आॅगस्टनंतर नागरिकांना त्रुटी विरहित संगणकीकृत सातबारा दिला जाणार आहे, असे नमूद करून सौरभ राव म्हणाले, जिल्ह्यातील १ हजार ९०९ गावांमधील सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरणाचे काम सुरू आहे. यापैकी १ हजार १९७ गावांमधील सातबारा उताऱ्यांचे संगणकीरणाचे काम ९८ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. ७१२ गावांमध्ये ८० ते ९० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. या गावामधील सातबारा संगणीकरणाचे आणि चावडी वाचनाचे काम १५ जूनपर्यंत केले जाईल. त्यानंतर १५ जुलैपर्यंत सातबारा उताऱ्यातील चुकांची दुरूस्ती केली जाईल. येत्या १ आॅगस्ट रोजी त्रुटीविरहित सातबारा नागरिकांना देणार आहे.
साताबाऱ्यातील त्रुटींना अधिकारी जबाबदार
By admin | Published: June 07, 2017 1:23 AM