नाशिक : सैनिकांना घरगड्यासारखे राबविणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांचा स्टिंग आॅपरेशनद्वारे भांडाफोड करून ते सोशल मीडियावर टाकणाऱ्या देवळाली कॅम्पमधील जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. २४ फेब्रुवारीपासून हा जवान बेपत्ता होता़ त्याच्या मृत्यूची केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत चौकशी होणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी शुक्रवारी सांगितले.लष्कराच्या तोफखाना विभागातील जवान डी.एस. रॉय मॅथ्यू (३५) याने बॅरेकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. (प्रतिनिधी)>पोलिसांना सापडली डायरीरॉय मॅथ्यू याने वरिष्ठ अधिकारी सैनिकांना कसे घरगड्यासारखे राबवून घेतात. मुलांना शाळेत सोडणे, कुत्र्यांना फिरविणे, भांडी घासणे आदी कामे करून घेतली जात असल्याचे चित्रीकरण करून सैनिकांच्या व्यथेला वाचा फोडली होती़ हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. व्हिडीओमुळे निर्माण झालेल्या वादाशी मॅथ्यूचा काही संबंध आहे का, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे समजते. रॉयचा मोबाइल व मल्याळम भाषेतील त्याची डायरी पोलिसांना मिळाली आहे. >लष्करातील अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचे स्टिंग करून रॉय मॅथ्यू याने ते सोशल साइटवर टाकल्याची माहिती मिळाली आहे़ त्यानुसार स्टिंग नेमके काय होते? त्याने वरिष्ठांकडे आपल्याला होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार का केली नाही? आत्महत्येचा निर्णय का घेतला? हे गृहमंत्रालयाच्या चौकशीतून बाहेर येईल. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.- डॉ़ सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
अधिकाऱ्यांचे स्टिंग आॅपरेशन करणाऱ्या जवानाची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2017 6:05 AM