मुंबई : राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मान्यतेने ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोरोनाची शक्यता सर्वाधिक तर १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना कमी धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोविड मुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात शाळांना पालकांसोबत ठराव करून निर्णय घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांनी स्वतःच शैक्षणिक साहित्य आणावे लागेल. त्याची अदलाबदल होऊ द्यायची नाही. शिक्षक, विद्यार्थी वा कर्मचारी संशयित आढळल्यास रुग्णालयात दाखल करून मदत कक्षाला सूचना द्यावी लागेल. नेमक्या कधी या शाळा सुरु होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
निर्जंतुकीकरणावर भर - शाळेमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, डेस्क, टेबल, खुर्च्या, वाहने यांची वारंवार स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी शाळा प्रशासनाची असून पालकांनी शक्यतो स्वतःच्या खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे, सार्वजनिक वाहनांचा वापर टाळावा, अशा सूचनाही एसओपीमध्ये आहेत. - रोज २ सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळेचे आणि त्यातील वर्गांचे स्वतंत्र आगमन आणि गमन यांचे वेळापत्रक व मार्ग शाळांनी निश्चित केल्यास विद्यार्थ्यांची गर्दी टाळता येणार आहे.
योग्य काळजी घ्यावी लागेल - एका बाकावर एक विद्यार्थी; २ बाकांमध्ये ६ फुटांचे अंतर - एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी - सत्रांच्या वेळा व महत्त्वाच्या विषयांचे आलटून पालटून नियोजन करणे- सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर/रॅपिड अँटिजन चाचणी अनिवार्य- विद्यार्थ्यांची उपस्थिती ऐच्छिक असून ती पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल, असे सांगण्यात आले.