कोल्हापूर : कागल पंचायत समितीतर्फे ‘दप्तराच्या ओझ्याला पर्याय जुनं ते सोनं’ हा उपक्रम जानेवारीपासून राबविला जात आहे. नावीन्यपूर्ण असा हा उपक्रम असून, प्रायोगिक तत्त्वावर बिद्री केंद्रातील सर्व शाळेत जानेवारीपासून सुरू आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यामुळे तालुक्यातील सर्व शाळांमध्ये कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे, अशी माहिती कागल गटविकास अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. शासनातर्फे दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे संच मोफत दिले जातात. परिणामी जुने संच विद्यार्थ्यांच्या घरी पडून राहतात. मात्र, या उपक्रमात २ मे रोजी जुने संच परत घेणे, जुने संच शाळेतच आपआपल्या जागेवर बेंचमध्ये ठेवणे, नवीन संच घरी अभ्यासाला ठेवणे, असे केल्यास पुस्तकांची ने-आण बंद होणार आहे. जुने संच कमी असतील, तर उपलब्ध संच दोन विद्यार्थ्यांमध्ये एक याप्रमाणे शाळेत बेंचमध्ये ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येकी दोन विषयांना एक १०० पेजीस वही, कच्ची नोंद ठेवण्याकरिता तीनच स्वाध्याय पुस्तिका शाळेत आणल्या जातील. प्रत्येक शिक्षकाकडे दोन विषय असतील, असे केल्याने मुलांच्या दप्तराचे ओझे कमी होईल. रोज विद्यार्थी तीन वह्या, स्वाध्याय पुस्तिका, पेन, कंपास इतकेच साहित्य घेऊन येतील, असा समावेश आहे. संपूर्ण तालुक्यातील शाळेत हा उपक्रम राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)
‘दप्तराच्या ओझ्याला पर्याय जुनं ते सोनं’
By admin | Published: February 09, 2015 12:03 AM