सध्या लग्नाचा सिझन सुरु झाला आहे. गुलाबी थंडीतच विवाह सोहळे आयोजित केले जात आहेत. यानंतर या जोडप्यांना हनिमुनचे वेध लागलेले असतात. थंडीत हनिमुनला कुठे जायचे याचे प्लॅनिंगही केले जात आहे. नेटवर ही ठिकाणे सर्चही केली जात आहेत. टुरिस्ट कंपन्या त्यांचे प्लॅन जाहिरातींद्वारे जाहीर करत आहेत. अशातच हनिमुनला जाण्यावरून सासरा आणि जावयामध्ये वाद झाला व त्याचे पर्यावसान जावयाला अॅसिड हल्ला करून मारण्याच्या प्रयत्नात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. ईबाद फालके आणि प्राथ खोटाल यांचे नुकतेच लग्न झाले होते. हे नवदांपत्य हनिमुनला जायचा प्लॅन करत होते. आता हनिमुनला कुठे जाणार यावरून चर्चा सुरु असताना मुलीच्या वडिलांनी त्यात उडी घेतली. सासऱ्याने या जावई आणि मुलीला हनिमुनचा स्पॉट सुचविला, परंतू जावयाला दुसरीकडेच जायचे होते. यावरून वाद झाला होता.
सासरा जकी खोटालला जावयाने व मुलीने हनिमुनला मक्का मदिनेला जावे असे वाटत होते. तर जावयाने त्याला आम्ही काश्मीरला जाणार असल्याचे सांगितले होते. यामुळे सासरा जावयावर दबाव टाकत होता. यावरून त्यांच्यात वाद झाला, जावई ऐकत नाही हे पाहून सासऱ्याने जावयावर अॅसिड हल्ला केला आहे. सासरा जकी खोटाल पळून गेला असून कल्याण बाजारपेठ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर जावई ईबाद हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यासर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांनी सांगितले.