आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने केलेली कामं जर बघितली, तर दिन, दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेत मजूर, महिला, अल्पसंख्यांक, सर्वांच्या जीवनात आम्ही परिवर्तन करत आहोत. आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. मात्र, एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, आम्ही लांगूल चालन खपवून घेणार नाही. आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन. जर कुणी मतांची लाचारी स्वीकारून 'हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे' यांना 'जनाब बाळासाहेब ठाकरे' म्हणत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, कारण मतांसाठी लाचारी पत्करणारे आम्ही नाही," असे म्हणत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. एवढेच नाही तर, "अरे आम्ही हार पतकरू, पण लाचारी पत्करणार नाही," असेही फडणवीस म्हणाले. ते मुंबईतील ओशिवरा मतदारसंघात महायुतीच्या प्राचर सभेत बोलत होते.
आम्ही हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, सर्वांचा विकास करू, पण... -फडणवीस पुढे म्हणाले, "अरे आम्ही हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, सर्वांचा विकास करू. पण तुम्ही, जर या ठिकाणी उलेमांच्या त्या ठिकाणी १७ मागण्या, काय मागण्या आहेत? वक्फ बोर्डाला हजार कोटी द्या, आमच्या लोकांना जे काही आमचे काजी आहेत त्यांना पगार द्या, १० टक्के मुस्लिमांना आरक्षण द्या, या १७ मागण्या, ज्या मागण्या देश हिताच्या मागण्या नाहीयेत." एवढेच नाही तर, "त्या मागण्यांवर जर या ठिकाणी काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची पार्टी लेखी देत असेल आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल आणि त्यांचे पाय चाटत असेल, तर आम्ही सहन करणार नाही. या देशामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो स्वधर्म आम्हाला शिकवलाय, तोच चालणार आहे. मतांचं लांगुल चालन हे आम्ही चालू देणार नाही," अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा साधला."आम्ही हार पतकरू पण लाचारी पत्करणार नाही" -"या ठिकाणी जर ते व्होट जिहादचा नारा देत असतील तर व्होटांचं धर्मयुद्ध आम्हाला करता येतं. व्होटांचं धर्मयुद्ध पुकारा आणि त्या धर्मयुद्धामध्ये आपल्याला माहिती आहे, पार्थाने सांगितलं होतं, जिथे सत्य आहे तिथेच विजय आहे. सत्य आपल्या बाजूने आहे आणि म्हणून विजय देखील आपल्याच बाजूने आहे. उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी मतांकरता लाचारी पत्करली असेल, अरे आम्ही हार पतकरू पण लाचारी पत्करणार नाही, आम्ही शिवबाची पोरं आहोत, शिवबाचे मावळे आहोत," असेही फडणवीस यावेळी म्हणाले.