ओझर : पुणे व पिंपरी शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूचे लागण झालेले रुग्ण आढळून आले. त्यानंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, डॉक्टर, कर्मचारी सतर्क झाले आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुन विविघ पावले उचलली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील तब्बल १९००० लोकांना उद्या (दि. २७ ) पासून १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्याचा आदेश देण्यात येणार आहे. त्यात पुणे ,मुंबई तसेच इतर शहरातून तालुक्यात आपआपल्या गावी वास्तव्यास आलेल्या लोकांचा समावेश असणार आहे. याअगोदर प्रशासनाने कोरोना संसर्ग देशातून परदेश दौरा करून आलेल्या ७० लोकांना यापूर्वी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यापैकी ३० लोकांचा १४ दिवसांचा कालावधी संपला आहे. हे लोक अमेरिका,रशिया ,सौदी अरेबिया,दुबई,जर्मनी,इजिप्त , कतार, दक्षिण कोरिया,नेपाळ या देशातून प्रवास करून आले आहेत.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. याचधर्तीवर कोरोनाचा प्रभावी निकराचा मुकाबला करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे , मुंबई तसेच इतर भागातुन आलेल्या लोकांना यापूर्वी घराबाहेर न पडण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या आता त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारणार आहेत. शिक्का मारून देखील त्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही व घराबाहेर पडले तर त्यांना प्रशासनाने राहण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी सक्तीने १४ दिवसांसाठी ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाने ओझर,लेण्याद्री देवस्थानचे भक्तभवन,नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र,बेल्हे येथील समर्थ कॉलेजच्या हॉस्टेल अशा विविध ठिकानी ६०० लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जे लोक १४ दिवसापूर्वी तालुक्यात आले आहेत त्यांना या आदेशातून वगळण्यात येणार आहे. प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील प्रत्येक गावात गाव पातळीवर गाव कमिटी तयार केली असून या कमिटीने गाव पातळीवर कोरोनाच्या प्रसार रोखण्याबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करणे प्रशासनाच्या आदेशाची लोकांकडून अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी व देखरेख करणे आदी कामे करणे अपेक्षित आहे.
कोरोना संबंधी तालुका प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा?्या व्यक्तींना समज द्यायची व त्यातून त्यांनी ऐकले नाही तर प्रशासकीय कारवाईसाठी प्रशासनाकडे या लोकांची माहिती देण्याचे काम या समिती मार्फत करण्यात येणार आहे. या समितीत सरपंच, मंडलाधिकारी,ग्रामसेवक,तलाठी,पोलीस पाटील,आरोग्य सेविका,कृषी सहाय्यक,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,कोतवाल यांचा समावेश आहे. गावात कोणाला सर्दी ,खोकला ताप असणा?्या लोकांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविणार आहेत. तालुक्यातील महसूल, पोलीस उपविभागीय कार्यालय,पंचायत समिती,तालूका आरोग्य विभाग ,नगर पालिका ,कृषी ,जुन्नर,ओतूर,नारायणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी , कर्मचारी व वरील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी तहसीलदार हनुमंत कोळेकर यांचे मार्गदर्शनाखाली व गट विकास अधिकारी विकास दांगट ,तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे,जुन्नर नगर पालिकेचे मुख्याधिकारी जयश्री काटकर यांचे समन्वयाने कोरोनाचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी दिवस रात्र कार्यरत आहे. जुन्नर तालुका कोरोनाच्या विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी लोकांना आवाहन केले आहे की सर्वांनी घरातच बसून राहून प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासनातील सर्व लोक त्यांच्या कुटुंबाची पर्वा न करता स्वत:चा जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी अहोरात्र यंत्रणा राबवित आहेत त्याची आपण जाणीव ठेवून आपण २१ दिवस आपत्कालीन स्थिती वगळता घराबाहेर पडू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.
............
जुन्नर तालुक्यात पुणे आणि मुंबई येथून जवळपास १९ हजार लोक आले आहेत. यातील नागरिक कोरोना बाधीत असू शकतात. यामुळे बाहेरून येणा-या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांद्वारे हे सर्वेक्षण सुरू आहे. तालुक्यात आतापर्यंत बाहेरून १९ हजार लोक आले आहेत. त्यांना घरातच क्वॉरंटाईन होण्याच्या सुचना आम्ही दिल्या आहेत. ज्यांना घरी विलगीकरण होऊन राहायचे नाही त्यांची त्यालुक्यात ७ ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारले आहेत, त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत परदेशातून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करण्यात येऊन त्यांच्या हातावर क्वॉरंटाईनचे शिक्के मारण्यात आले होते. जे बाहेरून आलेले नागरिक क्वारंटाईन होणार नाही, त्यांच्यावर थेट कारवाईचे आदेश आम्ही दिले आहे. सार्वजनिक आरोग्याचे हित बघता त्यांनीही प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाची लक्षणे आढळल्यास स्व:ताला विलगीकरण कक्षात ठेवावे. तसेच या बाबत आरोग्य विभागाला सुचना द्याव्यात.- हणमंत कोळेकर, तहसिलदार, जुन्नर तालुका.