अकोला : डाळवर्गीय कडधान्याचे भरमसाठ वाढलेले दर बघता शासनाने कडधान्य साठय़ावर र्मयादा आणली आहे; परंतु तेलबिया पिकाच्या साठय़ावरही र्मयादा आली आहे. त्याचा थेट परिणाम सोयाबीन दरावर झाल्याने राज्य शासनाने तेलबिया पिकाच्या साठय़ाची र्मयादा दहापटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनचे प्रतिक्विंटल दर ३९५0 पर्यंत पोहोचले होते; तथापि डाळवर्गीय कडधान्याची होणारी साठमारी आणि तूर डाळीचे गगनाला भिडलेले दर बघता, कडधान्याची साठमारी करणार्या गोदामांवर छापे टाकून डाळवर्गीय कडधान्यासह तेलबिया पिके जप्त करण्याचा सपाटा पुरवठा विभागाने सुरू केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या डाळींसह तेलबिया पिके जप्त करण्यात येत आहेत. परिणामी सोयाबीनचे सुरुवातीला वाढलेले दर झपाट्याने घसरले असून, सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये सोयाबीनचे दर ३६00 ते ३६५0 रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत. या पृष्ठभूमीवर शासनाने एका परवान्यावर २५00 क्विंटल केलेली तेलबियाची साठवणूक र्मयादा दहापटीने म्हणजेच २५ हजार क्विंटल करण्याचा निर्णय २९ ऑक्टोबर रोजी घेतला. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज ६.५ हजार क्विंटल सोयाबीनची आवक असते. गुरुवारी साडेसात हजार क्विंटल सोयाबीन विक्रीला आले; पण दर कमीच असल्याने शेतकर्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, विदर्भातील शेतकर्यांनी यावर्षी १७ लाख हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली; पण पाऊसच नसल्याने सोयाबीन उत्पादकांच्या हाती निराशा आली आहे. सोयाबीनचा उतारा एकरी ९ ते १0 क्विंटल येत होता, तो यावर्षी सरासरी एक ते दीड क्विंटल आहे. अनेक ठिकाणी एकरी २0 किलो सोयाबीनचे उत्पादन झाल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. हमीभावात वाढ झाली नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
तेलबियांचा साठा करता येईल आता दहापट!
By admin | Published: October 30, 2015 1:46 AM