- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 31 - ओला - उबरविरोधात रिक्षाचालकांनी मुंबईसोबत पुण्यातही आंदोलन सुरु केलं आहे. पण एकीकडे मुंबईत शांततेत आंदोलन सुरु असताना पुण्यातील रिक्षाचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पुणे आरटीओसमोर रिक्षाचालकांच्या आंदोलनादरम्यान ओलाच्या 2-3 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.
पुण्यात आरटीओसमोर रिक्षाचालक आंदोलन करत होते. 400 के 450 रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित रिक्षाचालकांनी सिग्नलवर उभ्या असलेल्या ओला-उबर कॅबच्या काचा फोडत तोडफोड केली.
ओला, उबर यासह अॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे, अवैध वाहतुकीवर बंदी आणावी आणि तीन वर्षे झालेल्या लायसन्सधारक रिक्षाचालकांना बॅच देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी ऑटोरिक्षा चालकांनी बुधवारी संप पुकारला असून त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. ऑटोरिक्षा चालक व टॅक्सीमेन्स युनिअनने आज पुकारलेल्या संपात मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरांतील मिळून १ लाखांहून अधिक रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सातारा, लातूर, नांदेड येथे रिक्षा बंद ठेवतानाच चालकांकडून निदर्शनेही करण्यात येत आहेत.
बेस्टच्या जादा बसेस -
रिक्षा संपामुळे मुंबईत बेस्टच्या जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने सकाळी १० वाजेपर्यंत एकूण ५९ जादा बसगाड्या चालविल्या आहेत. जवळ जवळ तीन हजार सहाशे बस आम्ही चालविणार आहोतच.याशिवाय गरज असेल त्याप्रमाणे जादा बसेस सोडण्यात येतील अशी माहिती बेस्टने दिली आहे.