ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - ओला, उबेर सारख्या टॅक्सींच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन धोरण अंमलात आणणार आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून सेवा देणा-या टॅक्सी कंपन्यांसाठी परिवहन विभागाने धोरण तयार केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर धोरण लागू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी दिली. नव्या धोरणामुळे ओला, उबेर आदी कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.परिवहन विभागाच्यावतीने राबविल्या जाणा-या विविध योजनांची माहिती देण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना रावते म्हणाले की, अॅपच्या माध्यमातून सेवा पुरवणा-या ओला, उबर आदी कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या टॅक्सींनादेखिल सामान्य टॅक्सीप्रमाणे मीटर लावणे बंधनकारक करण्यात येईल. त्यामुळे या कंपन्यांच्या माध्यमातून धावणा-या टॅक्सींच्या दरात सुसूत्रता येईल. तसेच अॅपच्या माध्यमातून चालणा-या टॅक्सींना केवळ मुंबई महानगरातच परवानगी देण्यात येईल, असे रावते म्हणाले. सरकारच्या प्रस्तावित धोरणामुळे सर्जच्या नावाखाली दुप्पट-तिप्पट भाडे वसूल करण्याचे प्रकार थांबणार आहेत. कायद्यातील पळवाटांचा आधार घेत सर्रास वाहतूक नियम तोडले जातात. त्यामुळे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार स्वत:चा कायदा आणणार आहे. त्यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात सुधारणा विधेयक मांडण्यात येईल. केंद्रीय कायद्याच्या कक्षेबाहेर असणा-या बाबींचा समावेश या विधेयकात करण्यात येणार असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. द्रुतगती मार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणा-यांवर तसेच वाहतूक नियमांचे भंग करणा-यांविरोधात परिवहन विभागाने ९ जून ते १७ जून दरम्यान विशेष मोहिम हाती घेण्यात आले होते. या मोहिमेत एकूण ४ हजार ९३२ वाहने दोषी आढळली असून त्यांच्याकडून तब्बल ६८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. तर, ३४ वाहने जप्त करण्यात आली.वाहन तपासणी मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी तपास पथकांच्या वाहनांवर व्हीडीओ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.पनवेल आणि पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालयातील पथकांच्या वाहनांवर प्रायोगिक तत्वावर व्हिडीओ कॅमेरे बसवून वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहन तपासणी मोहिमेसाठी हा प्रयोग राज्यात प्रथमच करण्यात आला आहे. या व्हीडीओ कॅमे-यांच्या साहाय्याने लेन कटींग आणि वेग मर्यादेचे उल्लघंन करणा-या ११६५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी ७५० वाहनमालकांना घरपोच नोटीसा देण्यात आल्या आहेत. तर उर्वरितांना नोटीसा पाठविण्याची कार्यवाही सुरु असल्याचे रावते यांनी सांगितले.
ओला, उबेरच्या मनमानीला लावणार चाप- दिवाकर रावते
By admin | Published: June 22, 2016 8:26 PM