नागपूर - विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यात प्रत्येक इच्छुकाने मतदारसंघात तयारी सुरू केलीय. यातच महायुतीसोबत असणाऱ्या अपक्षांना त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याची चिंता आहे. मला महायुतीकडून लढण्याची इच्छा आहे. मी आधीपासून शिवसेनेत राहिलोय. एकनाथ शिंदेंसोबत आहे. मात्र माझ्या जागेवर भाजपा, राष्ट्रवादीनेही दावा केलाय. त्यामुळे मीदेखील बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय असा सूचक इशारा भंडारा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.
आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, सध्यातरी युतीतून मला लढायचं आहे. मी शिवसेना-भाजपा विचाराचा आहे. परंतु परिस्थिती पुढे काय आहे, इथं भाजपा, राष्ट्रवादीचे लोक दावा करतायेत. त्या परिस्थितीत वरिष्ठांना त्यांना समजवण्यात यश आले तर काही नाही मात्र जागेच्या बाबतीत काही कमी जास्त होत असेल किंवा तिसऱ्याच पक्षाला तिकीट दिले. त्यातून आमचा जुना बॅकअप प्लॅन आहे तो तयारीत ठेवावाच लागेल. २०१९ मध्ये ही अपक्षच निवडून आलोय. एकनाथ शिंदेंसोबत चांगले संबंध आहे. मी जुन्यापासून शिवसेनेचा आहे. मी युतीच्या विचाराचा आहे. ते मला आपलेसे वाटतात असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय आम्हाला जुना अनुभव फार डेंजर आहे. तिकीट देतो, तिकिट देतो म्हणत होते, २०१९ ला उद्धव ठाकरे फोनच उचलत नव्हते. शिवसेना नेहमी मुंबई, ठाणे याला प्राधान्य देते. त्यामुळे आम्हीही पर्याय ठेवलेत. आमची मानसिकता शिवसेना-भाजपातून लढण्याची आहे परंतु परिस्थिती जर आली तर काय करायचं, घरी तर बसणार नाही त्यामुळे बॅकअप प्लॅन असायलाच हवा असं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलं.
दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत जे १० अपक्ष आहेत, त्यात सर्वात पहिला आधी मी त्यांच्यासोबत गेलो होतो. भंडारा जिल्ह्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षेनुसार न्याय मिळाला नाही. बघू पुढच्या काळात काय होते, निवडणुकीला अजून वेळ आहे. जी काही आश्वासने होती ते मुख्यमंत्री करतीलच. मंत्रिपद मिळाले असतील, महायुतीत कुणालाही मिळाले असते तर जिल्ह्याला न्याय मिळाला असता. ही खंत आमच्या मनात राहणारच आहे. वरिष्ठांनी एबी फॉर्म दिला तर लढू, द्यायचं की नाही हे त्यांच्या हातात. धनुष्यबाणावर लढण्याची इच्छा मात्र जागांवर दावा पाहता कुणाला जागा मिळते त्यावर ठरवू असं अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.