मुंबई/लोणावळा : नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून रद्द केलेल्या पाचशे-हजाराच्या नोटा जप्त करण्याचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी मुंबईतील मुलुंडमधून एक कोटीच्या तर लोणावळ्यातून ६० लाखांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. शुक्रवारी मुलुंडमधून एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. मुलुंड पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन सीएसह पाच जणांना अटक केली आहे. मुलुंड पश्चिमेकडील दालमिया इस्टेट परिसरात पाच जण कमिशन तत्त्वावर चलनातून रद्द केलेल्या नोटा बदली करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ ७चे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमान यांच्या पथकाने सापळा रचला. त्यांच्याकडून एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. हरिश विजय देशनेहरे, विपुल जैन, मल्लई सुरेश दोशी, कुंज तरक पटेल, कष्णकुमार वेल नाडार या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी दोघे जण हे सीए आहेत. यात दोशीने दिलेल्या माहितीत ही रक्कम चेंबूर येथील रहिवासी असलेले मंदार मास्टर याची असल्याचे सांगितले. तपास पथकाने मंदारच्या राहत्या घरी धाव घेतली. मात्र तो त्यापूर्वीच पसार झाला होता. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)लोणावळ्यात ६० लाख हस्तगतलोणावळा शहर पोलिसांनी जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या चौघांकडून ६० लाख रुपये ताब्यात घेतले. श्याम गोरख शिंदे , रोहिदास जवाहर वाघिरे, बालाजी निवृत्ती चिद्रावार, प्रशांत सुभाष शेवते अशी चौघांची नावे आहेत. त्यांनी गाडीच्या डिक्कीत एका बॅगेमध्ये एक हजारांच्या ६ हजार नोटा ठेवल्या होत्या. ही रक्कम श्याम शिंदे यांची असून, ती बालाजी चिद्रावार व प्रशांत शेवते बदलून देणार असल्याने घेऊन आल्याचे सांगण्यात आले. पोलीस कर्मचारी रोहिदास वाघिरे गाडीमध्ये होते. वाघिरे हे मागील काही दिवसांपासून आजारी रजेवर असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई, लोणावळ्यात दीड कोटीच्या जुन्या नोटा जप्त
By admin | Published: March 18, 2017 2:52 AM