स्नेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोटची तीन अपत्ये असतानाही ७२ वर्षांची आई पदपथावर राहत होती... कित्येक दिवस लोकांनी फेकलेल्या अन्नावर ती दिवस काढत होती. परंतु, तरीही तिच्या पोटच्या मुलांना दयेचा पाझर फुटला नाही, हे चित्र पाहून हृदय हेलावलेल्या कुर्ला नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोपर्डे अखेर पुढे आले. त्यांनी ‘स्नेहालय’ संस्थेला पत्र लिहून मदतीचे आवाहन केले; आणि मग याच विचारातून ‘स्नेहस्पर्श’ने जन्म घेतला. कुर्ल्यातील पदपथावर अत्यंत दयनीय स्थितीत ७२ वर्षीय सोनाबाई यांना कोपर्डे यांनी पाहिले. त्यांची अपार काळजी वाटून कोपर्डे यांनी मुंबई-पुण्यात अनेक संस्थांचा शोध घेतला. तथापि, एकाकी महिलांना नि:शुल्क आसरा देणारी संस्था त्यांना सापडली नाही. ‘स्नेहालय’च्या पत्त्यावर पत्र देऊन आजींना स्वयंसेवकासोबत तेथे पाठविले. या घटनेनंतर ज्येष्ठ आणि एकाकी महिलांना आश्रय देणारे ‘स्नेहस्पर्श’ हे केंद्र स्नेहालयने सुरू केले आहे. अहमदनगर येथील खेडगावमध्ये असलेल्या ‘स्नेहस्पर्श’ येथे पहिल्या टप्प्यात १५ महिलांना प्रवेश देण्यात येणार आहे. यातील सक्षम असलेल्या ७ महिलांकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार असून, ८ महिलांना त्यातून विनामूल्य सांभाळले जाणार आहे. केडगावमधील नव्याने उभारण्यात आलेल्या ‘अहमदनगर इंटरनॅशनल सेंटर’ येथे सध्या स्नेहस्पर्श कार्यरत आहे. ‘स्नेहस्पर्श’ हे केंद्र १५०० स्क्वे. फूट एवढ्या परिसरात विस्तारले आहे. या ठिकाणी भोजनगृह, वैद्यकीय व्यवस्था, करमणूक साधने अशी परिपूर्ण व्यवस्था आहे. >‘स्नेहस्पर्श’च्या स्वयंसेवकांची चमू ज्या वेळी सोनाबार्इंना मदत करण्यासाठी कुर्ला परिसरात दाखल झाली. त्या वेळेस पेन्शनच्या पैशांच्या आमिषाने मला मदत करू नका, अशी आर्त विनवणी त्यांनी केली. माझ्याकडे काहीच नाही, अंगावर आहे त्या कपड्यांवरच मी येणार, हे मंजूर असेल तरच मदत करा, अशा शब्दांत सोनाबाई यांनी व्यथा मांडली.>लवकरच या केंद्राशी राज्यातील रुग्णालयांना जोडण्यात येणार आहे. जेणेकरून ‘स्नेहस्पर्श’मधील या ज्येष्ठ महिलांच्या आरोग्यतक्रारींवर उपाययोजना करण्यात येतील.- डॉ. गिरीश कुलकर्णी, स्नेहालय, मानद संचालक>सोनाबार्इंच्या निमित्ताने ‘स्नेहस्पर्श’ केंद्र सुरू झाले. या समाजात आपले हक्काचे घर, कुटुंब असूनही त्यांच्यावर आलेली ही परिस्थिती डोळ्यांत पाणी आणणारी आहे. परंतु आता हे वास्तव स्वीकारून सोनाबाई या केंद्रात समाधानाने वास्तव्य करीत आहेत. - भारत कुलकर्णी, स्नेहस्पर्श, मानद संचालक
‘त्या’ वृद्धेला अखेर मिळाला ‘स्नेहस्पर्श’
By admin | Published: June 08, 2017 6:08 AM