- अजित गोगटेकल्याण शहराने आजही आपली एक आगळीवेगळी ओळख टिकवून ठेवली आहे आणि ती म्हणजे जुना दूधनाका. दूध काय सगळीकडेच मिळते, मग कल्याणच्या या दूधनाक्याची एवढी मिजास कशासाठी? त्यासाठी जाणून घ्यायला हवीत, ती त्याची वैशिष्ट्ये. या नाक्याची म्हणून उभी राहिलेली संस्कृती. येत्या आठवड्यातील जागतिक दूध दिनानिमित्त...गेल्या १५-२० वर्षांत कल्याण शहर खूप वाढले आणि त्यामुळे ही ऐतिहासिक नगरी आपला चेहरामोहरा हरवून बसली, अशी खंत जुन्या कल्याणकरांच्या बोलण्यातून ऐकायला मिळते. हे बव्हंशी खरे असले तरी कल्याण शहराने आजही आपली एक आगळीवेगळी ओळख टिकवून ठेवली आहे आणि ती म्हणजे जुना दूधनाका. विस्तारित शहरात राहणाऱ्या, नव्याने कल्याणमध्ये वास्तव्यास आलेल्या किंवा शहराच्या पूर्व भागात स्थायिक झालेल्या नव्या लोकांनी जुना दूधनाका पाहणे तर सोडाच, पण ऐकलेही नसेल. पण, जुन्या कल्याणचे या दूधनाक्याशी घनिष्ट नाते आहे, किंबहुना जुन्या कल्याणच्या शेकडो घरांमधील तीनचार पिढ्या या नाक्यावरील दुधावरच वाढल्या आहेत. त्यामुळे हा दूधनाका त्यांच्या नसानसांत भिनला आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही.या दूधनाक्याचे शहराच्या नकाशावरील स्थान अगदी उत्तरेला आहे. कोणत्याही जुन्या शहराप्रमाणे पूर्वीच्या कल्याणमधील वस्तीही हिंदू आणि मुस्लिम अशी धर्मांच्या आधारे विभागलेली आहे. कल्याण खाडीच्या किनाऱ्यावर अत्यंत गजबजलेला व दाटीवाटीचा मुस्लिम मोहल्ला आहे. मुस्लिम मोहल्ला संपून जेथे हिंदूंची वस्ती सुरू होते, त्या हद्दीवरच हा जुना दूधनाका आहे. यातील नाका या शब्दावरून आपल्या डोळ्यांसमोर एखाद्या मोठ्या, भव्य चौकाचे चित्र येत असेल, तर तो भ्रम आहे. चौक म्हणायला येथे चार रस्ते नाहीत. दूधनाका हे वस्तुत: दोन तिठ्यांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या रस्त्याचे नाव आहे (तिठा म्हणजे तीन रस्ते जेथे मिळतात असा नाका). महापालिका मुख्यालयाच्या समोरील शंकरराव झुंजारराव चौकातून दोन रस्ते फुटतात आणि ते दोन्ही दूधनाक्यावर जाऊन संपतात. बाजारपेठेतून जाणारा रस्ता कोकण मर्कंटाइल बँकेपर्यंत; तर टिळक चौकातून जाणारा रस्ता विजय लॉण्ड्री किंवा ‘आई’ बंगल्यापर्यंत जातो. या दोन टोकांच्या मधला भाग दूधनाका म्हणून ओळखला जातो. या दोन टोकांना जोडणारा रस्ता दोन मोठ्या बस जेमतेम पास होतील, एवढा अरुंद आहे.याला जुना दूधनाका का म्हणतात, हेही मजेशीर आहे. पूर्वी टिळक चौकात नगरपालिकेचा एक कोंडवाडा होता. गावात फिरणारी बेवारस गुरे पकडून या कोंडवाड्यात ठेवली जायची. या कोंडवाड्याच्या समोर दोनतीन पायऱ्यांचा एक चौथरा होता. कल्याण शहराच्या आसपासच्या गावातील शेतकरी आपल्या घरचे दूध हंड्यांमधून आणून या चौथऱ्यावर विकायला बसायचे. येथे होणाऱ्या दुधाच्या व्यापाराचे प्रमाण कमी असायचे. हा दूधनाका नव्याने सुरू झाला, म्हणून आधीपासून असलेला दूधनाका जुना दूधनाका झाला. टिळक चौकातील कोंडवाडा व दूधनाका गेला. त्यामुळे जुनेनवे करण्यासारखे काही राहिले नाही. तरी जुना दूधनाका हेच नाव प्रचलित झाले.दूधनाका या शब्दावरूनच या स्थळाचा दुधाशी संबंध स्पष्ट होतो. नावाप्रमाणे या नाक्यावर दुधाचा बाजार भरतो. कल्याण खाडीच्या किनारी म्हशींचे असंख्य गोठे (तबेले) आहेत. या तबेल्यांमध्ये काही हजार म्हशी आहेत. या म्हशींचे ताजे, फेसाळलेले, धारोष्ण दूध या नाक्यावर विकले जाते. सुट्या दुधाची विक्री केली जाते. म्हणजे, तुम्हाला हवे तेवढे दूध पिशवीत भरून दिले जाते किंवा दुधासाठी तुम्हाला भांडे न्यावे लागते. काही मोठ्या विक्रेत्यांचे दुकानांचे कायमस्वरूपी गाळे आहेत. काही रस्त्यावर बसून दूध विकतात. नाक्यावर पहाटे ३ ते सकाळी ७ व सकाळी ११.३० ते दुपारी २ या वेळांत दूधविक्री होते. तबेल्यांमध्ये म्हशींचे दूध काढले की, ते मोठ्या कॅनमध्ये भरून विक्रीच्या ठिकाणी आणले जाते. जसजसे दूध काढले जाईल, तसतसे ते नाक्यावर पोहोचवले जाते. हल्ली काहींनी दुधाची वाहतूक करण्यासाठी छोटे रिक्षा टेम्पो वापरणे सुरू केले आहे. अन्यथा, सायकल हेच दूध वाहतुकीचे प्रमुख साधन. सायकलच्या कॅरिअरला सहा हूक लावलेले असतात. त्या हुकांना सहा कॅन अडकवले जातात. अशा प्रकारे एका सायकलवरून एका वेळी साधारणपणे २५० लीटर दूध तबेल्यातून नाक्यावर आणले जाते. एवढे कॅन कॅरिअरला लावल्याने सायकल चालवणे शक्य नसल्याने ती हातात धरून ढकलतच आणावी लागते. काढलेले दूध संपेपर्यंत अशा प्रकारे सायकलच्या खेपा सुरू असतात.तुम्ही म्हणाल की, दूध काय सगळीकडेच मिळते, मग कल्याणच्या या दूधनाक्याची एवढी मिजास कशासाठी? हे समजून घेण्यासाठी आपण या नाक्याची काही वैशिष्ट्ये पाहू. सर्वात पहिला गुणविशेष म्हणजे येथील दुधाचा भाव. मटक्याचा आकडा फुटतो, तसा येथील दुधाचा भाव दररोज फुटतो. हा भाव कोण आणि कसे ठरवतो, हे धंद्याचे गुपित आहे. पण, जो भाव फुटेल, त्याच भावाने सर्व विक्रेते दूध विकतात. रोजचा भाव वेगळा असतो आणि सकाळचा भाव दुपारी नसतो. गावात इतरत्र मिळणाऱ्या पिशवीच्या दुधाच्या तुलनेत नाक्यावरचा भाव नेहमीच जास्त असतो. हिंदू व मुस्लिमांच्या सणांच्या वेळी व उन्हाळ्यात लीटरचा भाव ६५ ते ७० रुपयांपर्यंतही जाऊ शकतो. पावसाळ्यात व थंडीत हा भाव ४५ ते ५५ च्या घरात असू शकतो.नाक्याचे दुसरे वैशिष्ट्य असे की, येथे दुधाचा रतीब नाही. म्हणजे, दूध घरपोच आणून दिले जात नाही. तुम्हाला एक लीटर दूध हवे असो अथवा शंभर लीटर, ते तुम्हाला स्वत: नाक्यावर जाऊनच आणावे लागते. दूध कितीही घेतले, तरी दरातही सवलत मिळत नाही. पूर्वी काही विक्रेते महिन्याच्या बांधील भावाने दूध देत आणि त्यांना महिनाअखेरीस पैसे द्यावे लागत. हल्ली ही सोय बंद आहे. त्यामुळे रोज रोख पैसे देऊनच दूध खरेदी करावे लागते. गेली काही वर्षे शहराच्या इतर भागांत व खासकरून नव्याने झालेल्या कॉम्प्लेक्समध्ये काही जण नाक्यावरचे म्हणून दूध विकू लागले आहेत. यापैकी काही जण नाक्याच्या भावानेच दूध विकतात, तर काही जण लीटरला नाक्यापेक्षा दोन रुपये जास्त घेतात. जे त्याच भावाने दूध इतरत्र विकतात, त्यांच्या दुधाचा दर्जा दरावरूनच स्पष्ट होतो. जे दोन रुपये जास्त घेतात, त्यांच्या दर्जाचीही खात्री देता येत नाही. अर्थात, हे इतरत्र जे दूध जेथे विकले जाते, तेथील लोकांनी नाक्यावरचे असली दूध कधी चाखलेलेच नसल्याने त्यांना दर्जाची तुलना करणेही शक्य नसते. पण, पिशवीपेक्षा ताजे दूध चांगले, एवढेच समाधान!नाक्याचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे तेथील दुधाचा दर्जा. नाक्यावरील दुधाचा धंदा पूर्णपणे मुस्लिमबांधवांच्या ताब्यात आहे. काहींच्या प्रत्येकी दीडदोनशे म्हशी आहेत. इस्लाममध्ये दुधात पाणी घालणे हराम मानले जाते, ही धर्मश्रद्धा नाक्यावर आजही बऱ्यापैकी टिकून आहे. त्यामुळे येथे हमखास दर्जेदार दूध मिळते. नाही म्हणायला हल्ली नाक्यावरही काही जण दुधात हेराफेरी करणारे झाले आहेत. पण, नेहमीचे ग्राहक ठरलेल्या विक्रेत्यांकडूनच वर्षानुवर्षे दूध घेतात, त्यामुळे मालात खोट येत नाही. नाक्यावर सकाळी ७ नंतर आणि दुपारी ३ नंतर जे दूध विकत असतात, त्यांचे दूध पहिल्या प्रतीचे नाही, असे सर्वसाधारणपणे समजण्यास हरकत नाही.आमच्या घरी आम्ही गेली किमान ५०-६० वर्षे नाक्याखेरीज अन्य दूध तोंडाला लावलेले नाही. जो एकदा नाक्यावरचे दूध वापरेल, तो नंतर इतर कुठलेही दूध वापरू शकत नाही. शेकडो कुटुंबांचा हा पिढीजात अनुभव आहे. माझ्या मते, लीटरला ३०० ग्रॅम चक्का होणे, हा नाक्यावरच्या दुधाचा खरा निकष आहे. लहान मुलाला वरचे दूध म्हणून नाक्यावरचे दूध द्यायचे असेल, तर त्यात पाणी घालूनच द्यावे लागते. नुसते आहे तसे दूध तान्ह्या मुलांना पचू शकत नाही. काहींना सकाळी उठून जाण्याचा कंटाळा म्हणून ते जवळपास राहत असूनही नाक्यावरचे दूध आणत नाहीत. काहींना नाक्यावरचे दूध महाग वाटते. पण, नाक्यावरचे दूध महाग नाही, हे मी माझ्या ५० वर्षांच्या अनुभवावरून सांगू शकतो. नाक्यावरच्या दुधासाठी तुम्ही महिन्याला एक हजार रुपये खर्च केलेत, तर चहापाणी, दूधताक होऊनही दरमहा ४००-४५० रुपयांचे तूप होत असेल, तर नाक्याच्या दुधाला महाग कसे बरे म्हणता येईल?या दूधविक्रीच्याच अनुषंगाने दूधनाक्याची आणखी एक आणि निवडक चोखंदळांनाच माहीत असलेली आणखी एक ओळख म्हणजे मलईपाव. नाक्यावर पहाटे फक्कड मलईपाव मिळतो. ताज्या दुधावरची भाकरीसारखी जाड साखर घातलेली मलई आणि नाक्यावरच्याच बेकरीत तयार झालेला गरमागरम पाव, असा हा मेन्यू असतो. नाक्यावर दुधाच्या धंद्याच्या निमित्ताने मध्यरात्रीनंतर दिवस उजाडेपर्यंत गजबज असते. या धंद्यातील लोकांचा पहाटेचा हा आवडता नाश्ता आहे. गावातील नामचीन खवय्येही हा मलईपाव खाण्यासाठी मुद्दाम पहाटे ३ पर्यंत जागून किंवा त्या वेळी मुद्दाम उठून नाक्यावर जात असतात. अर्थात, कॅलरी मोजून खाणाऱ्यांना या मलईपावची लज्जत कधी कळणार नाही. असा ही कल्याणचा दूधनाका शेकडोंचा पोशिंदा आहे. येथे दररोज लाखो आणि वर्षाला कोट्यवधी रुपयांच्या दुधाची रोखीने विक्री होते. दुधाचा धंदा करणारे मालामाल आहेत. याखेरीज, तबेल्यात म्हशींची देखभाल करणारे, दूध काढणारे, दुधाची वाहतूक करणारे, ग्राहकांना दूध मोजून देणारे, गवताचा व्यापार करणारे, पशुखाद्य विकणारे अशा शेकडो लोकांची कुटुंबे या दूधनाक्यावर चालतात. नाक्यावरच्या मेडिकल स्टोअर्समध्ये माणसांसोबत जनावरांना लागणारी औषधेही नियमितपणे मिळतात, हे ओघाने आले.अशा या दूधनाक्याची २००५ मध्ये २६ जुलैच्या प्रलयाने दैना केली. खाडीकिनारी असलेल्या तबेल्यांमध्ये रात्री अचानक पुराचे पाणी शिरले आणि शेकडो म्हशी दाव्याला बांधलेल्या स्थितीतच मरण पावल्या. राहिलेल्या म्हशी तबेल्यांतून सोडून नाक्याच्या परिसरातील रस्त्यांवर जागा मिळेल तेथे आणून बांधल्या गेल्या. म्हशी ओळखू याव्यात, यासाठी त्यांच्या शिंगांना ज्यानेत्याने खुणेसाठी वेगवेगळे रंग लावले. पुढील आठदहा दिवस ज्यानेत्याने रंगानुसार आपापल्या म्हशी ओळखून त्यांचे रस्त्यावरच ठरल्या वेळी दूध काढले. बाकीच्या वेळी रस्त्यांवर या म्हशी बेवारस असायच्या. याचा गैरफायदा बाजारूबुंडग्यांनी घेतला. वेळी-अवेळी म्हशींचे अचळ ओढून पाहायचे आणि येईल तेवढे दूध चोरून काढून ते मिळेल त्या भावाने विकायचे, असे उद्योग त्यांनी केले. रोजचा दिनक्रम बदलल्याने दुधाचे उत्पादन घटले. थोडा काळ नाक्याची पार रया गेली आणि सच्च्या नाकाभक्तांना दुसऱ्या दुधाचा चहा घशाखाली उतरेनासा झाला. पण, पाऊस-पूर ओसरल्यावर नाका पुन्हा सावरला, बहरला आणि त्याने व त्याच्या दुधावर वाढलेल्यांनी पुन्हा एकदा बाळसे धरले! दूधनाका आणि धार्मिक तेढअशा या सकस, पौष्टिक दूधनाक्याचा धर्माचे राजकारण करणारे धार्मिक तेढ वाढवण्यासाठी व तणाव निर्माण करण्यासाठीही वापर करत असतात. मला आठवतंय, पूर्वी कल्याणमध्ये नेहमी हिंदू-मुस्लिम दंगली आणि ताणतणाव व्हायचे. असे वातावरण तापले की, हिंदू राष्ट्रप्रेमी नाक्याची नाकाबंदी करायला उभे राहायचे. दूध आणायला जाणाऱ्यांना अडवून माघारी फिरायला लावायचे. ‘मुसलमानांकडून दूध घेऊ नका. तुम्ही दूध नेता म्हणूनच ते डोक्यावर बसले आहेत’, असे नाक्यावरच्या निर्भेळ दुधातही धार्मिकतेचे जहर कालवले जायचे. अर्थात, सच्चे नाकाप्रेमी या भगव्या विषपेरणीला बळी पडले नाहीत, हा भाग अलाहिदा!दूधनाका मुस्लिम मोहल्ल्याला खेटून असल्याने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये नाक्यावर नाचताना चेव चढतो. रस्ता अरुंद असूनही एकेका मंडळाचे नाचे, एरव्ही नाक्याचा जो रस्ता पाचदहा मिनिटांत पार होऊ शकतो, तेथे तासदीड तास नाचत राहतात. हल्ली गुलालाचे प्रमाण कमी झाले. पूर्वी नाक्यावर उधळण्यासाठी गुलालाची पोती मुद्दाम राखून ठेवली जायची. जणू काही नाका हा पाकिस्तान आहे, असा विकृत समज करून घेऊन प्रक्षोभक घोषणा दिल्या जायच्या. गेली काही वर्षे पोलिसांनी नव्या मंडळांना विसर्जन मिरवणूक दूधनाक्यावरून नेण्यास मनाई केली आहे. मात्र, जुन्या मंडळांचा परंपरेच्या नावाखाली नाक्यावर धुडगूस चालूच असतो.
जुना दूधनाका : कल्याणची सकस ओळख!
By admin | Published: May 28, 2017 1:38 AM