नागपूर विद्यापीठ : ‘एलएलबी’च्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्ननागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘एलएलबी’च्या (तीन वर्षीय अभ्यासक्रम) चौथ्या सेमिस्टर परीक्षेच्या निकालांतील जादुई गोंधळासंदर्भात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तीन महिन्यांअगोदर झालेली चूक लपविण्याच्या नादात निकालात सलग दोन चुका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अभ्यासक्रमाच्या दोन प्रश्नपत्रिकांमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आले होते. या प्रश्नांना गुण कसे द्यावे या संभ्रमातून ही चूक झाली आहे.तीन वर्षीय ‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टरच्या (सीबीएस) निकालात एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चक्क दोन विषयांत सारखे गुण देण्यात आले होते. परंतु त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या सुधारित निकालांत अ़नेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली असून ही बाब थोड्याथोडक्या नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांसोबत झाली आहे. अगदी ‘टॉपर्स’मध्ये असलेले विद्यार्थी अ़नुत्तीर्ण झाले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, संबंधित गोंधळ निस्तरण्यासाठी विधीशाखा अधिष्ठाता डॉ. हस्तक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणांत अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहे. मानवी चुकीमुळे हा प्रकार झाल्याचे कारण सांगून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासंदर्भात माहिती काढली असता आश्चर्यचकित करणाऱ्या बाबी समोर आल्या. उन्हाळी परीक्षांच्या काळातच सर्वात पहिली चूक झाली होती. ‘लेबर लॉ-२’ आणि ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ’ या दोन्ही विषयांत दोन प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील होते. ज्या विद्यार्थ्यांना ही चूक लक्षात आली होती, त्यांनी परीक्षा विभागात तक्रारदेखील केली होती. यासंदर्भात विषयतज्ज्ञांची बैठक झाली व ही तक्रार योग्य असल्याचे निदर्शनास आले होते. विद्यार्थ्यांना संबंधित प्रश्नांसाठी सरासरी गुण देण्यात यावे असा सल्ला देण्यात आला होता. परंतु कोणाला किती गुण देण्यात यावे यासंदर्भात हलगर्जीपणा झाला व त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना समान गुण देण्यात आले. ‘सेम टू सेम’ गुणांची जादू लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने सुधारित निकाल जाहीर केले. यासंबंधात सरासरी गुणांसंदर्भात कर्मचारी आणि निकालांचे काम पाहणारी कंपनी यांना निर्देश देण्यात आले होते. परंतु त्यांनी गंभीरतेने हा मुद्दा न घेतल्याने विद्यार्थ्यांना मूळ अंक प्रदान करण्यात आले अन् अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. यासंबंधात प्रतिक्रियेसाठी परीक्षा नियंत्रकांशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)
जुन्या चुकीमुळे झाली निकालाची ‘जादू’?
By admin | Published: August 11, 2014 12:49 AM