लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: वस्तू आणि सेवाकर (जीएसटी)च्या अंमलबजावणीची प्रक्रिया सर्वत्र सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने विविध कंपन्यांकडून डीलर्सला दिला गेलेला स्टॉक किती आहे, याची माहितीही देणे जीएसटीत बंधनकारक आहे. त्यामुळे कंपनीच्या वरिष्ठांकडून अकोल्यातील सर्व कंपन्यांच्या डीलर्सला तशा प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे अकोल्यातील व्यापारी आता जुन्या स्टॉकची माहिती जुळविण्यासाठी लागले आहेत. एकीकडे जीएसटीची आॅनलाइन प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन झालेले नाही तर दुसरीकडे स्टॉकच्या मोजणीचे नवीन संकट व्यापाऱ्यांना सांभाळावे लागत आहे. स्टॉकबाबतची माहिती दिली गेली नाही, तर त्याची सवलत भविष्यात जीएसटीमध्ये मिळणार नाही. त्यामुळे देशभरातील सर्व नामांकित कंपन्यांच्या प्रमुखांनी लहानसहान डीलर्सकडून ही नोंद मागितली आहे. व्यापारी दुकानदारांकडून जुन्या स्टॉकची मोजणी सुरू झाली असून, त्यात बराच वेळ खर्च होत असल्याने ही अट डोकेदुखी झाली असल्याचे बोलले जात आहे. जीएसटी लागू होण्याआधी जुना स्टॉक विकणे गरजेचे झाल्याने अनेक कंपन्यांनी विविध योजना सवलती देऊन माल विक्रीसाठी काढला आहे. नियमानुसार साठ दिवसांचा अवधी दिला गेला असून, त्याची संपूर्ण माहिती पोर्टलवर देणे गरजेचे आहे. ही माहिती दिली गेली नाही, तर जुन्या नोटांप्रमाणे जुन्या स्टॉकची स्थिती होणार आहे. याचा मोठा आर्थिक फटका कंपनी आणि डीलर्स दोघांनाही सहन करावा लागणार असल्याने, स्टॉकमध्ये असलेल्या विविध कंपनीच्या उत्पादनांची मोजणी त्यांचे बॅच नंबर, निर्मिती तारीख आदी नोंदी घेतल्या जात आहेत.
‘जीएसटी’साठी जुना स्टॉक डोकेदुखी!
By admin | Published: June 13, 2017 1:46 AM