- स्नेहा मोरे, मुंबई सुमारे शंभर वर्षांपूर्वी औरंगाबादमधील अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील चित्रांचे दस्तावेजीकरण करण्याच्या उद्देशाने तत्कालीन निजाम संस्थानने पुढाकार घेतला होता. निजाम संस्थानच्या पुरातत्त्व खात्याचे संस्थापक गुलाम याझदानी यांनी सय्यद अहमद, मोहम्मद जल्लालुदीन व त्यांच्या चमूकडून लेण्यांमधील चित्रे कॅनव्हासवर चितारून घेतली. यापैकी ४२ चित्रे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात असून, त्यांना नवी झळाळी देण्याचे काम सुरू केले आहे.सध्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा संग्रहालयातील आर्ट कर्न्झव्हेशन सेंटरमध्ये सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत संग्रहातील चित्र, शिल्प, छायाचित्रे, फ्रेम्स, वस्त्र आणि इन्स्टॉलेशन्स अशा विविध कलाकृतींचे संवर्धन करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात अंजिठा-वेरुळ लेण्यांच्या चित्रांपासून होणार आहे. या चित्रांचा अभ्यास, संशोधन, सद्य:स्थितीची निरीक्षणे, छायाचित्रण हे सर्व काम सुरू असून त्याद्वारे विश्लेषण करून नोंदी करण्यात येत आहेत. ही चित्रे १ फुट लांब व १ फुट रुंदा या आकारापासून ६ फुट लांब व ७ फुट रुंद या आकाराची आहेत. या चित्रांना नवी झळाळी देण्यासाठी ५-६ संवर्धकांचा चमू मुख्य संवर्धक सल्लागार अनुपम शहा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. म्युझियम आर्ट कन्झर्व्हेशन सेंटरच्या या प्रकल्पाला एका खासगी बँकेने ५ कोटींचे आर्थिक पाठबळ दिले आहे. त्यापैकी ३.५ कोटींचा निधी संवर्धनासाठी व १.५ कोटींचा निधी म्युझियममधील शिक्षण विभागासाठी देण्यात आला आहे.गेल्या ८९ वर्षांपासून ही चित्रे म्युझियमच्या संग्रहात आहेत. त्यामुळे चित्रे अत्यंत जुनी झाली असून चित्रांचा विश्लेषणाचा टप्पा सुरू आहे. या संपूर्ण प्रोजेक्टचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. - अनुपम शहा, मुख्य संवर्धक सल्लागारआर्ट कर्न्झव्हेशन सेंटरसाठी हा प्रकल्प आव्हानात्मक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संग्रहात असल्याने चित्रांना घड्या पडल्या होत्या. त्या घड्यांना सरळ करण्यासाठी जड काचा त्यांवर ठेवणे यापासून ते थेट चित्रांमागील कापड वेगळे करणे, त्यांची दुरुस्ती करणे, चित्रांचे छायाचित्रण अशी वेगवेगळ््या स्वरूपातील कामे सध्या सुरू आहेत. - दिलीप मेस्त्री, संवर्धक साहाय्यक
जुन्या चित्रांना मिळणार नवी झळाळी
By admin | Published: July 18, 2015 1:21 AM