ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीची चांगली सेवा मिळावी, या उद्देशाने सत्ताधारी आणि विरोधकांनी नवीन बसची चाचपणी न करताच केवळ आचारसंहिता लागण्यापूर्वी त्या ठाणेकरांच्या सेवेत देऊन मतांचा जोगावा मिळवण्यासाठी जुन्या बॅटऱ्या आणि टायर असलेल्या बसेस घेतल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी याचे खापर परिवहन प्रशासनावर फोडले जात होते. परंतु, आता प्रशासनाने घूमजाव केल्याने सत्ताधारी आणि विरोधक अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही महिन्यांत ३५ बसेस दाखल झाल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु, त्यांना बसवलेले टायर आणि बॅटऱ्या जुन्या असल्याची बाब परिवहन समितीच्या बैठकीत उघड झाली होती. याबाबत, परिवहन प्रशासनाने कबुली देऊन कंपनीकडून टायर व बॅटऱ्या बदलून घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकारामुळे टीएमटीचा संपूर्ण कारभार चौकशीच्या कचाट्यात सापडला होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत या मुद्यावरून चर्चेला सुरुवात होताच प्रशासनाकडून त्यासंबंधीचा खुलासा करण्यात आला. नवीन बसची खरेदी करण्यापूर्वी अभियांत्रिकी विभागाने त्यांची पाहणी व तपासणी केली होती. मात्र, बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होण्यापूर्वी त्यांची अंतिम तपासणी करणे गरजेचे असते. अभियांत्रिकी विभागाकडून मात्र तशी तपासणी झाली नव्हती, असे स्पष्टीकरण व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिले. तसेच यापुढे अभियांत्रिकी विभागाकडून तशा प्रकारची तपासणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. कंपनीसोबत पत्रव्यवहार केला असून कंपनीने १२० टायर आणि १६ बॅटऱ्या बदलून देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी अनेक गाड्यांचे टायर आणि बॅटऱ्या बदलून देण्यात आल्या आहेत, असेही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>बस आल्या गोदामातूननिवडणुकांपूर्वी या बसचे उद्घाटन उरकायचे असल्यामुळे कंपनीकडून घाईघाईने त्या मागवण्यात आल्या.कंपनीने त्यांच्या एका गोदामातून नवीन बसेस पाठवल्याने त्यामधील टायर आणि बॅटऱ्या जुन्या होत्या, अशी कबुलीही त्यांनी दिली.
नव्या टीएमटीला जुने टायर आणि बॅटऱ्या
By admin | Published: January 07, 2017 3:51 AM