नाशिक : जिल्ह्यातील तळेगाव रोही येथील रहिवासी असलेला दत्तू बबन भोकनळ याने भारताचे प्रतिनिधित्त्व आॅलिम्पिक स्पर्धेत रोर्इंग क्रिडाप्रकारात केले होते. दत्तूने यावर्षी बारावीची परीक्षा दिली होती. या परिक्षेत तो उत्तीर्ण झाला आहे. त्याने ६५०पैकी ३४४ एकूण गुण मिळवित ५२.९२ टक्क्यांनी यश संपादन केले आहे.दत्तू हा अत्यंत गरीब कुटुंबातून संघर्ष करीत पुढे आला आहे. त्याने जिद्दीतून गरीबीवर मात करीत भारतीय सैन्यदलात प्रवेश केला आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचे उच्चशिक्षणाचे स्वप्न पुर्ण होणार आहे. दत्तूला बारावीच्या परिक्षेत भूगोल विषयात सर्वाधिक ७१ गूण तर सर्वात कमी गुण इंग्रजी (३५) मध्ये मिळाले आहे. दत्तू इंग्रजीत काठावर पास झाला. दत्तूला मराठीमध्ये ४८, इतिहासमध्ये ५०, राज्यशास्त्रात ६५ तर अर्थशास्त्रात ५१ गुण मिळाले आहे. दत्तू सैन्यदलात हवालदार या पदावर कार्यरत आहे.
परीक्षेसाठी त्याने अवघ्या पंधरवड्याची सुटी घेतली होती. परिक्षेच्या तयारीसाठी तसा दत्तूला कमी वेळ मिळाला; मात्र त्याने आपल्या एकाग्रतेने आणि जिद्दीने बारावी उत्तीर्ण केली. आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीमध्ये दत्तूने स्वत:ला झोकून दिले होते. त्यामुळे त्याला नियमित विद्यार्थी म्हणून बारावीच्या परिक्षेला प्रविष्ट होणे अवघड झाले होते. त्याने यावर एक्सटर्नल चा पर्याय निवडला आणि बारावीचा अर्ज भरला. परिक्षेचे माझ्या मनावर कुठलेही दडपण नव्हते. ‘मी नियमित विद्यार्थी नसलो तरी सर्व विषयांचे पाठ्यपुस्तके घेऊन मी अभ्यास करत होतो. कुठल्याही परिस्थिीतीत बारावी उत्तीर्ण व्हायचे अशी खुणगाठ मनाशी बांधली होती.त्यामुळे मी मन लावून अभ्यास केला आणि त्याचे फळ मिळाले याचा आनंद होत आहे’ अशा भावना दत्तूने ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.