ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - उडता पंजाब आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यातला वाद चांगलाच चर्चेत आला. या वादातून उडता पंजाबचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी तर थेट सेन्सॉर बोर्ड आणि पहलाज निहलानींवरच टीकेची झोड उठवली होती. तेव्हा बॉलिवूडकरही अनुराग कश्यपच्या समर्थनार्थ पुढे आल्याचं पाहायला मिळालं. शेवटी हा वाद न्यायालयात गेला आणि न्यायालयानं उडता पंजाबच्या निर्मात्यांना झुकतं माप दिल्यानं उडता पंजाबच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.
मात्र आता उडता पंजाबची सेन्सॉर कॉपीच लीक झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. तशी रीतसर तक्रारच सायबर सेलकडे करण्यात आली आहे. त्यामुळे उडता पंजाबच्या निर्मात्यांना नक्कीच धक्का बसला आहे. या प्रकारामुळे उडता पंजाबच्या बॉक्स ऑफिसवरच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सध्या देशात पायरसीचा मुद्दा चर्चेत असल्याने आता उडता पंजाबचे निर्माते हे प्रकरण कशाप्रकारे हाताळतात, हे पाहावे लागेल. तर एकीकडे उडता पंजाब लीक होण्यामागे सेन्सॉर बोर्डाचा हात असल्याचही बोललं जातंय. तसेच, उडता पंजाब'ची कॉपी लीक करण्यामागे पहलाज निहलानी तर नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र लीक होण्यामागचं गूढ अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
प्रदर्शनाच्या तोंडावर उडता पंजाब लीक होणं हे निर्मात्यांना परवडणारं नाही. या आधी सुपरडुपर हीट झालेला 'सैराट' या मराठी चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लीक झाली होती. मात्र तरीही सैराट या सिनेमानं कोट्यवधींच्या घरात गल्ला कमावला. परंतु आता उडता पंजाबही बॉक्स ऑफिसवर अशीच कमाई करेल का? हे चित्रपट प्रदर्शनानंतरच कळेल.