उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत सर्वशक्तीनिशी उतरून राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता हस्तगत करेल. ओमी कलानी टीम हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच भाग आहे आणि त्यांच्या कामामुळे उल्हासनगरात सत्ताही आमचीच येईल, असा दावा पक्षाचे प्रभारी, माजी मंत्री गणेश नाईक यांनी गुरूवारी केला.राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी शहर निरीक्षक सुधाकर वढे, आमदार ज्योती कालानी, प्रमोद हिंदूराव यांच्या उपस्थितीत खेमानी येथील कलानी महलमध्ये होतील, असा तपशील त्यांनी पुरवला. ओमी कलानी यांच्या टीमचे काम पाहून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रवेशाचा गळ टाकल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ओमी, त्यांची टीम व व्यापारी संघटना राष्ट्रवादीचेच अंग असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. दुसऱ्या पक्षातील चांगल्या नेत्यांना प्रवेश देवून भाजपा राजकारण ख्ोळत आहेत. त्याला ओमी टीम अपवाद असूु शकत नाही. उल्हासनगरात ओमी टीमची क्रेझ असून त्याद्बारे राष्ट्रवादीला सत्ता मिळेल, असा दावा नाईक यांनी केला. राष्ट्रवादीचे अर्धे-अधिक उमेदवार घोषित झाले असून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. उरलेल्या इच्छुकांच्या मुलाखती शनिवारी पार पडतील आणि यादी घोषित केली जाईल, असे ते म्हणाले. उल्हासनगर महापालिकेत गेली दहा वर्षे शिवसेना-भाजप, साई व रिपाइं महायुतीची सत्ता आहे. पण या काळात शहर १० वर्षे मागे गेले. शहराऐवजी या नेत्यांचाच विकास झाल्याचा टोमणा त्यांनी लगावला. एकही योजना पूर्ण करू न शकलेले महायुतीतील नेते कोणत्या तोंडाने मते मागणार, असा प्रश्न त्यांनी केला. (प्रतिनिधी) शनिवारपूर्वी ओमी भाजपात?ओमी टीमच्या धास्तीने शिवसेना-भाजप, रिपाइं व साई पक्षाची युती अंतीम टप्यात आहे. त्याची घोषणा केव्हाही होऊ शकते, असे संकेत भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी व शिवसेना प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिले. भाजपचे वरिष्ठ नेते ओमी कालानी टीमच्या संपर्कात असून त्यांनीही युतीची चर्चा सुरू ठेवली आहे. राष्ट्र्वादीचे नेते ओमी टीमबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीने त्यांना आश्वासन देण्यापूर्वी म्हणजेच शनिवारपूर्वी ओमी कलानी टीमला भाजप अटी-शर्ती बाजुला ठेवून प्रवेश देणार असल्याचे पक्षातील नेतेच खाजगीत सांगत आहेत. >दोन दिवस महत्त्वाचे उल्हासनगरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्तारूढ भाजपातील एका गटाने ओमी यांना प्रवेश द्या, अन्यथा फूट अटळ असल्याचा इशारा दिल्याने दोन दिवसांत पक्षाला निर्णय घ्यावा लागणार आहे. केंद्रात, राज्यात, पालिकेत सत्तेत असलेल्या पक्षात फूट पडली तर निवडणुकीत त्याचा चुकीचा संदेश जाईल, यामुळे भाजपाला तोवर निर्णय घ्यावा लागेल. त्याचवेळी आधी उमेदवार निश्चित झाले असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी पुन्हा मुलाखती घेण्याचे ठरविल्याने तेही ओमी यांना आश्वासन देण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे जी काही राजकीय उलथापालथ घडणे अपेक्षित आहे, ती येत्या दोन दिवसांत होईल, असा अंदाज आहे.
ओमी टीमही आमचीच, सत्ताही राष्ट्रवादीचीच
By admin | Published: January 20, 2017 4:08 AM