पुणे/नवी दिल्ली/जयपूर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ७ बाधित आढळल्याने खळबळ उडाली. आळंदीत एका तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असून, त्याचे नेमके निदान झालेले नाही. ओमायक्रॉनबाधितांचीराज्यात एकूण संख्या ८ झाली आहे. राजस्थानातील जयपूर येथे नऊ तर राजधानी दिल्लीत एक असे दहा ओमायक्रॉनबाधित रविवारी आढळले. ओमायक्राॅनबाधितांची देशातील संख्या आता २१ झाली आहे.
राज्यात डाेंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला बाधित आढळला. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ७ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. भारतीय वंशाची महिला २४ नोव्हेंबरला नायजेरियातून पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. या तिघींच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची तपासणी केली असता महिलेचा भाऊ, दोन मुली अशा सहा जणांनाही लागण झाल्याचे उघड झाले. पुण्यातील ओमायक्राॅन बाधित फिनलँड येथून परतला हाेता.
ब्रिटनमध्ये रुग्णसंख्येत पाचपट वाढब्रिटनमध्ये ओमायक्राॅन व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कालपर्यंत या विषाणूचा संसर्ग झालेले ३२ रुग्ण आढळून आले हाेते. आता हा आकडा एकाच दिवसात जवळपास पाच पटीने वाढून १६० वर गेला आहे. त्यावरून हा विषाणू किती वेगाने पसरताे, याचा अंदाज येऊ शकताे. अमेरिकेतही ओमायक्राॅनचे रुग्ण वाढून ८ झाले आहेत.