कल्याण: केपटाऊनहून डोंबिवलीत आलेल्या त्या प्रवाशाचा जीनोम सिक्वेसिंग टेस्टचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने तो ओमायक्रॉन व्हेरीअंटचा रुग्ण असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेती आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे.
Omicron Patient in Maharashtra: मोठी बातमी! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला
दक्षिण आफ्रिकेतील केपटाईन शहरातून केपटाईन ते दुबई, दुबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा प्रवास करुन हा प्रवासी डोंबिवलीत आला होता. या प्रवाशाला सौम्य ताप आला होता. तसेच इतर कोणतीही लक्षणो आढळून आली नव्हती. प्रवाशाची कोरोना चाचणी केली असता त्याची चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे महापालिकेने त्याला आर्ट गॅलरी येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. हा रुग्ण ज्या ठिकाणी राहतो. त्या इमारतीतील नागरिकांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. त्याचबरोबर त्याच्या नातेवाईकांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे.
याशिवाय हा रुग्ण ज्या डॉक्टरकडे तपासणी करीता गेला होता त्या डॉक्टरची तपासणीही निगेटीव्ह आली आहे. याशिवाय हा रुग्ण ज्या खाजगी कारने मुंबईहून डोंबिवली असा प्रवास केला. त्या चालकाचीही कोरोना टेस्टही निगेटीव्ह आली आहे. या रुग्णाच्या बरोबर दिल्ली ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशाचीही कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी सर्व नागरिकांनी घ्यावी. मास्कचा वापर करावा. मास्कचा वापर न करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाईची मोहिम अधिक तीव्र स्वरुपात राबविली जाणार आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली तयारी महापालिकने केली आहे.