मुंबई - राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुरुवारी टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी या बैठकीत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आजपासून २४ डिसेंबर रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.
ओमायक्रॉनच्या(Omicron) वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने चिंता व्यक्त केली आहे. देशात ओमायक्रॉनचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार पाऊलं उचलणार आहे. राज्यात पुन्हा रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागू करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच, ३१ डिसेंबरला रात्री केले जाणारे नववर्षाचे सेलिब्रेशन यावर निर्बंध आणण्यासंदर्भातही या बैठकीत विचार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
देशात रात्री लॉकडाऊन लावण्याचा विचार...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी विधानसभेत चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. सभागृहात काही सदस्य विनामास्क असल्याचं दिसताच अजित पवारांनी खडसावून सांगितले की, काही जणांचा अपवाद सोडला तर अधिवेशन सुरू झाल्यापासून मी पाहतोय कोणीही मास्क लावत नाही. देशाचे पंतप्रधान हे कोरोनासंदर्भात गंभीर असून त्याबाबत बैठका घेत आहेत. काही राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. विषाणूमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. परदेशात दीड दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. येत्या काळात परदेशात पाच लाख लोकांची मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
ओमायक्रॉनची संख्या ३२५ वर
गुरुवारी देशात ओमायक्रॉनचे तब्बल ६४ रुग्ण आढळले असून त्यात तामिळनाडूत ३३, तेलंगणात १४, कर्नाटकात १२, केरळमध्ये ५ असे नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात २३ नवे रुग्ण आढळल्याने ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ८८ वर पोहचली आहे. राज्यात पुण्यात १३, मुंबई ५, उस्मानाबाद २, ठाणे, नागपूर, मीरा भाईंदर येथे गुरुवारी प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.