- धनंजय रिसोडकर नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या चार दिवसांवर आले असताना, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्राॅनमुळे साहित्य संमेलनातील उपस्थिती ५० टक्क्यांवर आणावी लागणार आहे. आता ७ हजार रसिकांचीच उपस्थिती बंधनकारक राहणार आहे.राज्य शासनाच्या सुधारित नियमावलीनुसार बंदिस्त सभामंडपाच्या जागेतील संमेलनासाठी ५० टक्के उपस्थितीचा नियम असल्याने, आता नाशिकच्या साहित्य संमेलनासाठीची उपस्थिती कमी राखण्यासह कोरोनासंबंधित सर्व प्रकारच्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची कसरत आयोजकांना करावी लागणार आहे.
वर्षारंभी कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना, साहित्य संमेलनासाठी २६ ते २८ मार्च हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, मार्च महिन्यातच कोराेनाचा उद्रेक वाढू लागल्याने, संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. अखेरीस दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर संमेलन ३ ते ५ डिसेंबरदरम्यान घेण्याचे निश्चित करण्यात आले. आता संमेलन अवघ्या चार दिवसांवर आले असताना आणि मंडपात खुर्च्याही दाखल झालेल्या असताना शासन आदेशानुसार संमेलनातील उपस्थितीवर निर्बंधांचे सावट आहे. किमान नाशिकमध्ये तरी नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये, या दृष्टीने महापालिका, जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
संमेलनस्थळी रॅपिड अँटिजन चाचणी करणारसाहित्य संमेलनाच्या स्थळावर रॅपिड अँटिजन चाचणी करण्यासह प्रत्येकाला मास्क आणि सॅनिटायझर देण्याचेही नियोजन आधीपासूनच करण्यात आले आहे. त्याशिवाय प्रत्येकाचे स्क्रिनिंग करण्याचेही नियोजन आयोजकांनी आधीपासून केले आहे. त्यामुळे निर्बंध वाढल्याने नियोजनात कोणताही मोठा फरक पडणार नसल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
मुख्य सभामंडपाची क्षमता १४ हजार आसन क्षमतेची आहे. मात्र, शासनाच्या आधीच्या नियमाप्रमाणे आम्ही आधीपासूनच निम्मे म्हणजे, ७ हजार खुर्च्यांचेच नियोजन केले होते. निर्बंधांचे धोरण असेल, त्याप्रमाणे अंतर राखून आसनव्यवस्था केली जाईल. - जयप्रकाश जातेगावकर, निमंत्रक