मुंबई - पुढील काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यात आली आहे. येत्या १६ ऑगस्टला मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये मविआच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
या बैठकीनंतर मविआ नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज मविआच्या तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत धोरणात्मक चर्चेवर अधिक भर होता. तिन्ही पक्षांनी मिळून राज्यात उत्तम सरकार दिले हे जनतेला ठाऊक आहे. संकटाच्या काळात मविआ सरकारने जे काम केले त्याची नोंद देशाने घेतली हेदेखील सर्वांना माहिती आहे. मविआच्या तिन्ही पक्षातील नेत्यांनी धोरणात्मक चर्चा केली. किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात जाहिरनाम्याचं काम जोरात सुरू आहे. १६ ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा होईल. त्याचसोबत २० ऑगस्टला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी बैठकीचं आणि मोठ्या रॅलीचं आयोजन आम्ही केले आहे. या कार्यक्रमात मविआच्या मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती आम्ही केली आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय १६ तारखेच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील. एक उत्तम सरकार देण्याच्या दृष्टीने त्याचा शुभारंभ महाराष्ट्रात या मेळाव्यातून होणार आहे. आज झालेली चर्चा मविआ सरकार आणण्याचं ध्येय ठेवून सकारात्मक चर्चा घडली. तिन्ही पक्ष मिळून या महाभ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून हाकलवून द्यायचे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्राला, गहाण ठेवलाय गुजरातला, मिंदे कंपनी राज्याला गुजरातकडे गहाण ठेवण्याचं काम करतेय. ४० टक्क्यांपर्यंत सरकारची कमिशनखोरी झालीय. निवडणुकीची वाट जनता बघतेय. या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी वाट पाहतेय. त्यासाठीच आज धोरणात्मक, जाहिरनामा, किमान समान कार्यक्रम यावर चर्चा झाली. पुढची बैठक लवकरच होईल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
दरम्यान, लोकसभेत मविआने महायुतीची चांगली जिरवली, आता विधानसभेला महायुतीला सत्तेतून हाकलवण्यासाठी आजची बैठक होती. निवडणुकीपूर्वी लोकप्रिय घोषणा आणून मतांची बिदागी करता येईल का असा महायुतीचा केविळवाणा प्रयत्न सुरू आहे. मध्य प्रदेशात अशी योजना आणली आणि २ महिन्यात ती गुंडाळली गेली. इतर विभागाचे पैसे कमी करून या योजनेवर सरकार पैसे खर्च करतंय. आम्ही महिलांना सन्मानाने उभं करण्याचं काम मविआ करेल. यापेक्षा अधिकची मदत, महागाईत गरीब कुटुंबाला जगणं मुश्किल झालंय. त्यामुळे आम्ही महिलांना आधार देण्याचं काम करणार आहोत असं त्यांनी सांगितले.
"फसव्या योजनेला जनता बळी पडणार नाही"
विद्युत बिल वाढवून सर्वसामान्यांकडून वसुली केली जातेय. महागाई वाढवून जेरीस आणायचं आणि निवडणुकीच्या तोंडावर अशा योजना आणून फसवणूक करायची. याला जनता बळी पडणार नाही. १५ हजारापेक्षा अधिक मुली महाराष्ट्रात बेपत्ता आहेत. महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या नंबरवर आलेले आहे. त्यामुळे महिलांसाठी सुरक्षेची हमी हे लाभदायक आहे. सरकार जे काही निर्णय घेते त्याला जनता योग्य उत्तर देईल. महाभ्रष्टाचारी, ४० टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारला सत्तेतून घालवायचा निर्णय जनतेनं आधीच घेतला आहे असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.