मुंबई - शेती आणि कृषीविषयक धोरणांसाठी शरद पवार सातत्याने आग्रही असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. देशाचे कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेत. त्यात मोदी सरकारच्या कृषी धोरणाबाबत शरद पवार आवश्यकवेळी योग्य त्या सूचना करत असतात. आज सकाळी शरद पवारांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात वाचलेल्या बातमीचा हवाला देत थेट केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना पत्र लिहिलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्रात म्हटलं की, आज सकाळी मी पेपरला केंद्र सरकारच्या पशु व दुग्धविकास मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची बातमी वाचली. देशात यापुढे बटर, तूप यासारख्या गोष्टी आयात करण्यात येतील असं त्यात म्हटलं आहे. केंद्र सरकारने असा कुठलाही निर्णय घेतला असेल तर हा पूर्णपणे अन्यायकारक आहे. कारण सरकारच्या या निर्णयाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होऊ शकतो असं त्यांनी सांगितले. वाचा शरद पवारांचे पत्र
तसेच दूध उत्पादक शेतकरी कोविड काळातील संकटानंतर आता कुठेतरी उभारी घेत आहे. त्यात केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विषयावर सरकारने तात्काळ लक्ष द्यावे ही विनंती आहे. सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून या निर्णयाचा फेरविचार केला तर मला आनंद होईल असंही शरद पवारांनी पत्र लिहिलं आहे. शरद पवारांनी हे पत्र केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना लिहिले आहे.
काय आहे प्रकरण?दूध उत्पादनाची मागणी लक्षात घेता भारताला तूप, बटर यासारख्या डेअरी उत्पादन आयात करावे लागू शकते. २०११ मध्ये या गोष्टी भारताने शेवटच्या आयात केल्या होत्या. मागील वर्षी लंपी आजाराने १ लाखाहून अधिक जनावरे दगावली. हवामान, महाग चारा, त्वचा रोग यामुळे दूध उत्पादनात फारसी वाढ झाली नाही. त्यात घरगुती मागणी ८ ते १० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे गरज भासल्यास सरकार दूध उत्पादक गोष्टी बाहेरच्या देशातून आयात करण्याचा विचार करत आहे.