पुणे – शिवसेनेसह सगळ्याच पक्षांनी आतापर्यंत ऑफर दिली आहे. ही ऑफर आता नाही तर आधीच्या २०१७, २०१९ निवडणुकांमध्येही आली आहे. परंतु मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी एकनिष्ठ असून पक्षाच्या चिन्हावर मी निवडून आलो. मी लोकप्रतिनिधी म्हणून माझे मत मांडले. मी राजसाहेबांना मेसेज केला होता. परंतु रिप्लाय आला नाही. मात्र मनसे नेते बाबू वागसकर यांनी भेटून राज ठाकरेंचा(Raj Thackeray) निरोप दिला आहे. सोमवारी ‘शिवतीर्थ’वर साहेबांनी भेटायला बोलावलं आहे अशी माहिती मनसे नगरसेवक वसंत मोरे(Vasant More) यांनी दिली आहे.
वसंत मोरे म्हणाले की, पुण्यात नवनियुक्त शहराध्यक्ष झाल्यानंतर जो फटाके, गुलाल उधळलं ते कुठेतरी खटकलं. ते नको व्हायला हवं होतं. त्यामुळे खूप वेदना झाल्या. मी मनसेत आहे. पदाधिकाऱ्यांची समजूत काढली आहे. मी १५ वर्ष सक्रीय राजकारणात आहे. माझी नाळ लोकांच्या तळाशी आहे. याठिकाणी मनसे जिवंत ठेवण्याचं काम मी करतोय. म्हणून मी खंत व्यक्त केली होती. विचार बदलले नाहीत. मी राजसाहेबांशी कट्टर आहे. साहेब माझी बाजू नक्कीच समजून घेतील असं त्यांनी सांगितले.
तसेच मी १५ वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून लोकांशी नाळ जोडली आहे. मला जो प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी मत व्यक्त केले. त्यावर माध्यमांमध्ये राजसाहेबांचा आदेश झुगारला अशा बातम्या आल्या. आमचा घरचा विषय आहे. मी साहेबांना भेटायला जाणार आहे. १५ वर्षात मी साहेबांना फोन केलाय, मेसेज टाकलाय त्यावर नेहमी रिप्लाय आलाय. माझ्याकडे राजसाहेबांच्या आठवणी खूप आहेत. मन विचलित होते तेव्हा साहेबांचे जुने फोन कॉल आहेत. साहेबांचा आवाज ऐकला तरी ‘बोल रे वसंत’ मग सगळं संपून जातं. २७ वर्ष पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे भावूक झालो होतो. हकालपट्टी हा शब्द माझ्या कार्यकर्त्यांना आणि मलाही खटकला असं वसंत मोरे यांनी सांगितले.
तर वसंत मोरे यांच्याकडे शहर अध्यक्ष पदापेक्षा राज्याच सरचिटणीस पद आहे. वसंत मोरे हे मनसेत आहे आणि पक्षातच राहतील. वसंत मोरे यांना शिवसेनेची ऑफर आल्यामुळे आम्ही आलो नाही. वसंत मोरेंना कुठलीही ऑफर आली तरी मुख्यमंत्री म्हटले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाही. सोमवारी राजसाहेबांनी त्यांना भेटायला बोलावलं आहे. वसंत मोरे हा मनसेचा चेहरा आहे. त्यांच्यावर अन्याय झाला असं माध्यमात म्हटलं गेले. राजकारणात आणि पक्षात काही गोष्टी घडत असतात. वसंत मोरे हे भोळे आहेत. वसंत मोरे मनसेत आहेत आणि राहतील. राजसाहेबांचे मोरेंवर खूप प्रेम आहे. आम्ही डगमगू पण वसंत मोरे डगमगणार नाही अशी भावना मनसे नेते बाबू वागसकर यांनी व्यक्त केली आहे.