शिवसेनेच्या वर्धापनदिनी मविआचं भविष्य, अजित पवारांबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले, अजितदादा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 12:06 PM2023-06-19T12:06:08+5:302023-06-19T12:48:59+5:30
Sanjay Raut: गेल्या काही काळापासून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमकी घडत आहेत.
गेल्या काही काळापासून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमकी घडत आहेत. काल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची इच्छा असेपर्यंत महाविकास आघाडी टिकेल, असं विधान केलं होतं. त्यानंतर अजित पवार यांनीही त्यावर खोचक प्रत्युत्तर दिलं होतं. आता संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत पुन्हा प्रतिक्रिया देताना ते महाराष्ट्रातील बिग बी आणि महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते आहेत, असं विधान केलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, सुप्रिया सुळे सांगतात त्याप्रमाणे अजितदादा हे बिग बी आहेत. अजित पवार हे महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक आहेत. काल शिवसेनेचा मेळावा होता. त्या मेळाव्यात जसा विचार मांडायला हवा तसा तो आम्ही मांडला. फक्त काय शिंदे-मिंद्यांकडेच फेव्हिकॉलचा जोड असतो असं नाही. महाविकास आघाडीसुद्धा फेव्हिकॉलचा जोड आहे. उद्धव ठाकरेंचीसुद्धा इच्छा आहे की, महाविकास आघाडी ही २५ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकावी. पण मी एवढंच सांगितलं की, तुमची इच्छा आहे तोपर्यंत टिकणार. म्हणजे २५ वर्षांपेक्षा अधिक काळ टिकणार, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे.
दरम्यान, काल बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची इच्छा असेपर्यंत मविआ टिकेल. महाराष्ट्रात स्वबळावर भगवा झेंडा फडकवण्याची तयारी आम्ही करतोय. स्वबळावर आम्ही १४५ आमदार निवडून आणू. मुंबई महापालिका आम्ही जिंकू, असा दावा केला होता. त्यानंतर अजित पवार यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं होतं.
संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले होते की, प्रत्येकाला आपला-आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आजच्या घडली तिघे एकत्र आल्याशिवाय भाजपा आणि शिंदे गटाचा मुकाबला करू शकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत म्हणायचे, आमची आघाडी २५ वर्षे टीकणार आहे. तेव्हा २५ वर्षे टीकेल असं वाटत होतं. आता पुढे एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. यात चुकीचं काय.